पणजी : गोमंतकीय मध्यरक्षक भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू क्लिफर्ड मिरांडा यांच्याकडे ओडिशा एफसीने मंगळवारी सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली. आगामी मोसमातील आयएसएल स्पर्धेत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांना साह्य करतील.
क्लिफर्ड एक जुलैपासून कार्यभार स्वीकारतील असे ओडिशा एफसीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. गतमोसमापर्यंत 39 वर्षीय क्लिफर्ड एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. क्लिफर्ड यांनी सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने दिलेल्या योगदानाबद्दल एफसी गोवाने आभार मानले असून भावी कारकिर्दीसाठी त्यांना सुयश चिंतिले आहे.
धेंपो क्लबचे 15 वर्षे प्रतिनिधित्व
क्लिफर्ड यांनी धेंपो क्लबचे तब्बल 15 वर्षे प्रतिनिधित्व केले. या संघातर्फे त्यांनी राष्ट्रीय लीग, तसेच फेडरेशन करंडकही जिंकला. त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीची सुरवात सालसेत एफसीतर्फे झाली. चार वर्षांच्या कालावधीत जमशेदपूर येथील टाटा फुटबॉल अकादमीत त्यांची गुणवत्ता बहरली. स्पर्धात्मक फुटबॉलमधून ते 2017 मध्ये निवृत्त झाले.
2018 मध्ये ते एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. नंतर सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने 2019-20 मोसमात ते एफसी गोवा मुख्य संघात रुजू झाले. त्याच मोसमातील अखेरच्या टप्प्यात त्यांनी आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे हंगामी प्रशिक्षकपदही सांभाळले होते.
गोमंतकीय फुटबॉल मार्गदर्शकाविषयी
क्लिफर्ड मिरांडा यांचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 2005 ते 2014 कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व
45 आंतरराष्ट्रीय सामने, 6 गोल
भारतातर्फे 2 वेळा सॅफ करंडक, तर 2008 मध्ये एएफसी चँलेंज कप जेतेपद
2000-2015 या कालावधीत धेंपो क्लबतर्फे मैदानात
धेंपोकडून खेळताना 2 वेळा राष्ट्रीय साखळी, तर 3 वेळा आय-लीग, 1 वेळ फेडरेशन कप विजेतेपद
2014 ते 2016 या कालावधीत आयएसएल स्पर्धेत खेळाडू या नात्याने एफसी गोवा आणि एटीके संघाचे प्रतिनिधित्व
2019-20 मध्ये प्रशिक्षणातील एएफसी प्रो-डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.