Ishant Sharma recalls Zaheer Khan Help during ODI debut in Ireland:
भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. त्याने कसोटीत 100 पेक्षा अधिक सामने खेळण्याचाही कारनामा केला.
इशांतने 19 वर्षांचा असतानाच भारताकडून पदार्पण केले होते. पण सुरुवातीला काहीच कळत नसल्याने त्याचा गोंधळ उडाला होता. याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. त्याने हे देखील सांगितले की त्याने पहिला वनडे सामनाही झहीर खानकडून शुज उधार घेऊन खेळला होता.
एकेकाळी इशांत आणि झहीर भारताची चांगली वेगवान गोलंदाजांची जोडी होती. दरम्यान, जिओ सिनेमावरील होम ऑफ हिरोज कार्यक्रमात इशांतने त्याच्या वनडे पदार्पणाचा किस्सा सांगितला आहे.
इशांतने 2007 मध्ये आयर्लंड दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्या दौऱ्याबद्दल सांगताना इशांत म्हणाला, 'मी सामन्यापेक्षाही प्रवासाबद्दल चिंतीत होतो. पण मी कसेबसे आयर्लंडला पोहोचलो, जेट लॅग झाला होता. पण त्यानंतर माझ्या लक्षात आले की माझी किट बॅग हरवली आहे.'
'मला माहित होतं की ट्रेनमध्ये गोष्टी चोरीला जातात, पण मला माहित नव्हते की फ्लाईटमध्येही अशा गोष्टी घडतात.'
'मी त्या रात्री ज्या कपड्यांमध्ये प्रवास केलेला, त्यातच झोपलो. माझ्याकडे माझी सुटकेस आणि माझी किट बॅगही नव्हती. माझ्याकडे तेव्हा कोणतेही कार्डही नव्हते, त्यामुळे माझे सर्व पैसेही तिथे होते.'
'मला माहित नव्हते की डेबिट आणि क्रेडिट कार्ड कसे वापरायचे, त्यामुळे माझ्या वडिलांनी मला कॅशच वापरण्यास सांगितली. मला त्यावेळी जी किट बॅग चोरीला गेली आहे, त्यासाठी क्लेम करण्याबद्दलही काही माहित नव्हते, त्यामुळे मी काहीच केले नाही.'
इशांतने नंतर झहीरने कशी मदत केली, हे देखील सांगितले. तो म्हणाला, 'राहुल द्रविडने मला सांगितले होते की दुसऱ्या दिवशी माझे पदार्पण होणार आहे आणि मी त्याला म्हणालो की 'पण मी अनवाणी खेळू शकत नाही. मी सरावही केला नव्हता.'
'मी झॅकला ११ नंबरच्या शुजसाठी विनंती केली, जेणेकरून मी सामना खेळू शकले. त्याने मला काही शुज दिले, पण त्यामुळे माझा अंगठा दुखत होता, पण मी त्याची काळजी केली नाही.'
इशांतने वनडे पदार्पण करण्यापूर्वी 2007 मध्ये मे महिन्यात बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे कसोटी पदार्पण केले होते.
याबद्दल त्याने सांगितले की 'मी बांगलादेश मालिकेत कसोटी पदार्पण केले होते, त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये हरभजन सिंग, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंग, वासिम जाफर असे खेळाडू होते. मी झॅकबरोबर बसायचो. मी त्यांना फक्त टीव्हीवर पाहिले होते आणि आता अचानक मला त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करायची होती.'
तसेच इशांतने सांगितले की त्याच्या आजुबाजूला सर्व दिग्गज होते, त्यावेळी त्याची अवस्थाही झहीरने समजून घेतली. इशांत म्हणाला, 'झॅकला मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, याची कल्पना आली. त्याने मला सांगितले की शांत राहा आणि रिलॅक्स राहा. त्यानंतर मला थोडं बरं वाटले, पण मी शांतपणे एका कोपऱ्यात बसलो होतो.'
इशांतने पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाल्याची आठवण सांगितली की 'मी घरी होतो, जेव्हा मला भारतीय संघातील निवडीबद्दल फोन आला. मला अजूनही आठवते की मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी पाहिले होते. ते आनंदाश्रू होते. त्यांनी मला सांगितले की ही फक्त सुरुवात आहे.'
'मी कधीही माझ्या वडिलांना मिठी मारली नव्हती. पण आमचे नाते चांगले होते, नक्कीच काही गोष्टींवरून मतभेद होते. पण ते त्यांच्या भावना दाबून ठेवत. त्यांना स्वत:ला मजबूत दाखवून द्यायचे होते. त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती की असाही दिवस येईल.'
इशांतने त्याच्या कारकिर्दीत 105 कसोटी सामने खेळले असून 311 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत त्याने 80 सामने खेळताना 115 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 14 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.