Irfan Pathan Dance with Rashid Khan after Afghanistan's win against Pakistan at Chennai in ICC ODI Cricket World Cup 2023 :
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी (23 ऑक्टोबर) अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघात चेन्नईला सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने 8 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे, यापूर्वी अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडलाही पराभवाचा धक्का दिला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळलल्यानंतर मैदानावर भारताचा अष्टपैलू इरफान पठाण अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानबरोबर डान्स करतानाही दिसला होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. इरफानने राशिदबरोबर डान्स करण्यामागील कारणाचा खुलासाही केला आहे.
झाले असे की अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमला एक चक्करही मारली.
यावेळी ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी काम करत असलेला इरफानही तिथे होता. त्याचवेळी त्याने राशिदला पाहाताच त्याच्याबरोबर डान्स करायला सुरुवात केली. यानंतर तो अन्य अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही भेटला.
या क्षणांचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. त्याचबरोबर इरफाननेही या क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून डान्स करण्यामागील कारणही उघड केले आहे. त्याने कॅप्शन लिहिले की 'राशिद खानने त्याचे वचन पूर्ण केले आणि मी माझे वचन पूर्ण केले. मस्त खेळलात.'
दरम्यान, अफगाणिस्तानचा हा पाकिस्तानविरुद्ध वनडेतील पहिलाच विजय होता. यापूर्वी त्यांना एकदाही पाकिस्तानविरुद्ध वनडेत विजय मिळवता आला नव्हता. या विजयामुळे अफगाणिस्तान वर्ल्डकपच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सोमवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 282 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 74 धावा केल्या. तसेच अब्दुल्ला शफिकने 58 धावांची खेळी केली, तर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 40 धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर नवीन-उल-हकने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाज 65 धावा केल्या, तर इब्राहिम झाद्रानने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली. या दोघांनी 130 धावांची भागीदारी केली. तसेच रेहमत शाहनेही नाबाद 77 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी 48 धावांवर नाबाद राहिला.
पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी आणि हसन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.