

IPL 2026 Points Table Update: आयपीएलच्या 19व्या हंगामातील 43वा लीग सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले असले, तरी दिल्ली कॅपिटल्सने एकतर्फी खेळ करत 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीने सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली असून गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. या विजयामुळे दिल्लीचे प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान अजूनही कायम आहे. दुसरीकडे, या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर स्थिर असून त्यांना फारसे नुकसान सोसावे लागलेले नाही.
आयपीएल 2026 च्या 43 सामन्यांनंतर गुणतालिकेचा विचार केल्यास, पंजाब किंग्सचा संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. पंजाबने 8 सामन्यांत 13 गुणांसह 1.043 च्या नेट रनरेटच्या जोरावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ असून, त्यांनी 9 पैकी 6 सामने जिंकून 12 गुण मिळवले आहेत; त्यांचा नेट रनरेट 1.420 इतका प्रभावी आहे. तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद असून त्यांनीही 9 पैकी 6 सामने जिंकले असून 12 गुणांसह त्यांचा नेट रनरेट 0.832 आहे.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 10 सामने खेळले असून 12 गुणांसह ते चौथ्या स्थानावर आहेत. तर गुजरात टायटन्स 9 सामन्यांत 10 गुणांसह पाचव्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रनरेट -0.192 आहे. दिल्ली कॅपिटल्सने आता 9 सामन्यांत 4 विजय मिळवून 8 गुणांसह सहावे स्थान गाठले.
गुणतालिकेच्या तळाच्या चार संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्सची स्थिती बिकट असून, 8 सामन्यांत 6 गुणांसह ते सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स 8 सामन्यांत 5 गुणांसह आठव्या स्थानी आहे. सर्वात वाईट अवस्था मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनऊ सुपर जायंट्सची झाली आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने खेळून केवळ 2 सामन्यांत विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट -0.784 आहे, तर लखनऊचा नेट रनरेट -1.106 इतका खाली घसरला. दिल्लीच्या या विजयामुळे आता मधल्या फळीतील संघांमध्ये प्लेऑफसाठी चुरस वाढली असून आगामी सामने अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.