IPL 2023: LSG चा अखेरच्या बॉलवर विजय! निकोसल-स्टॉयनिसच्या वादळापुढे RCB हतबल

आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने 213 धावांचे आव्हान पूर्ण करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला आहे.
Nicholas Pooran
Nicholas PooranDainik Gomantak
Published on
Updated on

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने अखेरच्या चेंडूवर एका विकेटने विजय मिळवला.

हा लखनऊ सुपर जायंट्सचा या हंगामातील त्यांच्या 4 सामन्यातील तिसरा विजय आहे. त्यामुळे त्यांचे आता 6 गुण झाले आहेत. मात्र आरसीबीचा तीन सामन्यातील दुसरा पराभव आहे.

या सामन्यात आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्ससमोर 213 धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊने 20 षटकात 9 विकेट्स गमावत 213 धावांचे हे आव्हान पूर्ण केले.

Nicholas Pooran
IPL 2023: बॉलर्सनं रोखलं, त्रिपाठीनं ठोकलं! हैदराबादची पंजाबवर मात, धवनची एकाकी झुंज व्यर्थ

नाट्यमयी अखेरचे षटक

लखनऊला विजयासाठी शेवटच्या षटकात 5 धावांची गरज होती. त्यांनी 19 व्या षटकापर्यंत 7 बाद 208 धावा केल्या होत्या. यावेळी मार्क वूड आणि जयदेव उनाडकट फलंदाजी करत होते. तसेच 20 वे षटक टाकण्यासाठी आरसीबीकडून हर्षल पटेल आला होता. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उनाडकटने 1 धाव घेतली.

पण दुसऱ्याच चेंडूवर हर्षलने वूडला एका धावेवर त्रिफळाचीत केले. पण तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने मारलेल्या शॉवर दुहेरी धावा निघाल्या. त्यामुळे 3 चेंडूत 2 धावा असे समीकरण झाले होते. चौथ्या चेंडूवर बिश्नोई आणि उनाडकटने एक धाव घेतली. मात्र पाचव्या चेंडूवर उनाडकट मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात फाफ डू प्लेसिसकडे झेल देत 9 धावांवर बाद झाला.

अखेरच्या चेंडूवर लखनऊला 1 धावेची गरज असताना नॉन-स्ट्राईकवर असलेला बिश्नोई हर्षलने चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडून बाहेर गेला होता, ते पाहून हर्षलने त्याला धावबाद करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण त्याच्याकडून तो चूकला आणि तो क्रिजमधून पुढे गेला. त्यानंतर त्याने चेंडू स्टम्पवर मारला. मात्र, अशाप्रकारे धावबाद नियमात बसत नसल्याचे सांगत पंचांनी हर्षलला पुन्हा हा चेंडू टाकण्यासाठी जाण्यास सांगितले त्यामुळे बिश्नोईला जीवदान मिळाले.

त्यानंतर हर्षल पुन्हा हा चेंडू टाकण्यासाठी गेला. त्याने टाकलेल्या या चेंडूवर आरसीबीचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला विकेट घेण्याची संधी होती. मात्र त्याच्याकडून गोंधळ झाला आणि आवेश आणि बिश्नोईने एक धाव पूर्ण करत लखनऊचा विजय निश्चित केला.

स्टॉयनिस - पूरनची फटकेबाजी

या सामन्यात लखनऊ फलंदाजीला उतरल्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मोहम्मद सिराजने काईल मेयर्सला पहिल्याच षटकात बाद केले होते, तर चौथ्या षटकात वेन पार्नेलने दीपक हुडा आणि कृणाल पंड्या असे दोघांना बाद करत लखनऊला दुहेरी धक्का दिला होता.

मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याला दुसऱ्या बाजूने संथ गतीने खेळ करत केएल राहुलने साथ दिली. स्टॉयनिसने आक्रमक खेळताना अर्धशतकही पूर्ण केले. अखेर त्याला 11 व्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या कर्ण शर्माने बाद केले. त्याचा 65 धावांवर शाहबाज अहमदने झेल घेतला. त्याने ही खेळी करताना 30 चेंडू खेळले आणि 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

पण त्यानंतरही लखनऊला मिळालेली लय निकोलस पूरनने कायम ठेवताना तुफानी फलंदाजी केली. पण केएल राहुल 12 व्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. त्याने 20 चेंडूत 18 धावा केल्या. पण तरी पूरनने फटकेबाजी सुरू ठेववी. त्याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले.

त्याला दुसऱ्या बाजूने आयुष बदोनीने साथ दिली होती. पण आक्रमक खेळणाऱ्या पूरनला 17 व्या षटकात सिराजने बाद करत मोठा अडथळा दूर केला. पूरनने 19 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 62 धावांची खेळी केली.

Nicholas Pooran
IPL 2023: पंजाबच्या सेनापतीचा 'वन मॅन शो'! धवन @99 नॉटआऊट, 'या' खेळाडूंही केलाय असा अनोखा विक्रम

त्यानंतर मात्र आरसीबीने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, बडोनी खेळपट्टीवर कायम होता. लखनऊला शेवटच्या 12 चेंडूत 15 धावांची गरज होती. पण 19 व्या षटकात पहिल्या 3 चेंडूत 8 धावा आल्या असताना बडोनीकडून चूक झाली. त्याने या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला खरा पण त्याची बॅट स्टम्पला लागली आणि त्याला 30 धावांवर हिट विकेट होत माघारी परतावे लागले. त्यामुळे षटकार मारूनही लखनऊच्या खात्यात त्या धावा जमा झाल्या नाही. अखेर शेवटच्या नाट्यमय षटकात लखनऊने विजय मिळवला.

आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तसेच हर्षेल पटेलने 2 विकेट्स आणि कर्ण शर्माने एक विकेट घेतली.

आरसीबीकडून तिघांचे अर्धशतक

तत्पूर्वी, या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या विराटला डू प्लेसिसची चांगली साथ मिळाली.

त्यांच्या भागीदारीदरम्यान विराटने त्याचे आयपीएलमधील 46 वे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर काहीवेळातच त्याला अमित मिश्राने 12 व्या षटकात बाद केले. विराट 44 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा करून बाद झाला. विराट आणि फाफ यांच्यात सलामीला 96 धावांची भागीदारी झाली.

यानंतर फाफने तुफानी खेळ करण्यास सुरुवात केली. त्याला ग्लेन मॅक्सवेलनेही आक्रमक खेळत चांगली साथ दिली. या दोघांनीही अर्धशतके झळकावली. दरम्यान, त्यांची जोडी अखेरच्या षटकात मार्क वूडने मॅक्सवेलला बाद करत तोडली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्यात 115 धावांची भागीदारी झाली.

दरम्यान मॅक्सवेलने 29 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तसेच फाफने 46 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीने 20 षटकात 2 बाद 212 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com