RCB vs LSG: IPL है भाई! शेवटचा बॉल, एक रन अन् एक विकेट... असा रंगला अखेरच्या षटकाचा थरार

सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 213 धावांचे आव्हान अखेरच्या चेंडूवर पूर्ण करत सामना जिंकला.
RCB vs LSG
RCB vs LSGDainik Gomantak
Published on
Updated on

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: सोमवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झालेला सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊने नाट्यमयरित्या अखेरच्या चेंडूवर एका विकेटने विजय मिळवला.

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (61), फाफ डू प्लेसिस (79*) आणि ग्लेन मॅक्सवेल (59) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 2 बाद 212 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर लखनऊने पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतरही मार्कस स्टॉयनिस (65) आणि निकोलस पूरन (62) यांनी तुफानी फटकेबाजीसह अर्धशतके झळकावत लखनऊच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या.

दरम्यान, निकोलस पूरनने 15 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले होते. पण तो बाद झाल्यानंतर मात्र लखनऊचा संघ अडचणीत सापडला होता. पण तरी अखेरच्या चेंडूवर लखनऊला 213 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात यश आले. 

असे रंगले अखेरचे षटक

अखेरच्या षटकात लखनऊला 5 धावांचीच गरज होती. लखनऊने 19 षटकात 7 बाद 208 धावा केल्या होत्या. तसेच 19 वे षटक संपले त्यावेळी मार्क वूड आणि जयदेव उनाडकट फलंदाजी करत होते. यानंतर महत्त्वाचे 20 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आरसीबीकडून हर्षल पटेलकडे चेंडू सोपवण्यात आला.

20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उनाडकटने 1 धाव घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या चेंडू खेळणाऱ्या स्ट्राईकवर आलेला वूड त्रिफळाचीत झाला. त्यामुळे रवी बिश्नोई फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने खेळलेल्या तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धावा निघाल्या. चौथ्या चेंडूवर बिश्नोई आणि उनाडकटने एक धाव घेतली. मात्र पाचव्या चेंडूवर उनाडकट मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात फाफ डू प्लेसिसकडे झेल देत 9 धावांवर बाद झाला.

RCB vs LSG
IPL 2023: RCBच्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला लाखांचा दंड; आवेश खानलाही फटकारले

त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 1 धाव असे समीकरण लखनऊ समोर होते. हा चेंडू टाकण्यासाठी येत असताना हर्षलने पाहिले की नॉन-स्ट्राईकवर असलेला बिश्नोई चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडून बाहेर गेला होता. त्यामुळे त्याने लगेचच त्याला धावबाद करण्याचा पहिला प्रयत्न केला, पण त्याच्याकडून स्टम्पला चेंडू लागला नाही. त्यामुळे तो त्याच लयीत क्रिजमधून पुढे गेला आणि त्यानंतर त्याने चेंडू स्टम्पवर मारला. पण अशाप्रकारे क्रिजच्या पुढे जाऊन धावबाद नियमात बसत नसल्याचे सांगत पंचांनी हर्षलला पुन्हा हा चेंडू टाकण्यास सांगितले.

यानंतर हर्षल पुन्हा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गेला. त्याने टाकलेल्या या चेंडूवर आरसीबीचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला विकेट घेण्याची संधी होती. मात्र त्याच्याकडून गोंधळ झाला आणि आवेश आणि बिश्नोईने एक धाव पूर्ण करत लखनऊचा विजय निश्चित केला.

दरम्यान, या विजयामुळे लखनऊने आयपीएल 2023 हंगामात 15 सामन्यांनंतर गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यांनी आत्तापर्यंत या हंगामात खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवले आहेत. मात्र, आरसीबी संघ सातव्या क्रमांकावर घसरला असून त्यांनी तीन सामन्यांमध्ये दोन पराभव स्विकारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com