IPL 2023: ब्रुकच्या शतकानंतर हैदराबादने रोखला कोलकाताचा विजयी रथ! राणा, रिंकूची अर्धशतकं व्यर्थ

आयपीएल २०२३ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला.
SRH
SRHDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 23 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी 229 धावांचे आव्हान ठेवले होते. पण कोलकाताला कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंगच्या अर्धशतकानंतरही 20 षटकात 7 बाद 205 धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे, तर कोलकाताला सलग दोन विजयानंतर पराभवाचा धक्का बसला आहे.

SRH
IPL 2023: मैदानात भिडण्यापूर्वी विराट-पाँटिंगची खास भेट, ज्यूनियर रिकीनंही वेधलं लक्ष; पाहा Video

या सामन्यात 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताकडून सलामीला रेहमनुल्लाह गुरबाज आणि एन जगदीशन उतरले होते. पण पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने गुरबाजला शुन्यावर बाद केले. त्यानंतर मार्को यान्सिनने चौथ्या षटकात कोलकाताला दुहेरी धक्के देताना वेंकटेश अय्यरला 10 धावांवर आणि सुनील नारायणला शुन्यावर लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.

पण त्यानंतर जगदीशनला साथीला घेत कर्णधार नितीश राणाने कोलकाताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी 62 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पण 9 व्या षटकात जगदीशनला मयंक मार्कंडेने 36 धावांवर बाद केले. पाठोपाठ आंद्र रसेलही 3 धावा करून बाद झाला.

मात्र नंतर रिंकू सिंगने कर्णधाराला दमदार साथ दिली. या दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमण करत 39 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी धोकादायक ठरत असतानाच 17 व्या षटकात टी नटराजनने नितीशला बाद केले. नितीशने अर्धशतक पूर्ण करताना 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 75 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

SRH
हॅरी ब्रुकनं झळकावलं IPL 2023 मधील पहिलं शतक! विराट-रोहितसारख्या दिग्गजाच्या पंक्तीत सामील

त्याच्यानंतर शार्दुल ठाकूरने रिंकूला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण शार्दुल 7 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. रिंकूने अर्धशतक करत कोलकाताला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. त्याने 31 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 58 धावांची खेळी केली. दरम्यान हे त्याचे पहिले आयपीएल अर्धशतक ठरले.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून मार्को यान्सिन आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी कोलकाताने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. हैदराबादकडून सलामीला हॅरी ब्रुक आणि मयंक अगरवाल उतरले. त्यांनी चांगली सुरुवात देण्याचाही प्रयत्न केला. पण कोलकाताच्या आंद्रे रसेलने पाचव्या षटकात गोलंदाजीला येत हैदराबादला दोन धक्के दिले.

त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मयंक अगरवालला 9 धावांवर आणि नंतर अखेरच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीलाही ९ धावांवर बाद केले. पण त्यानंतर ब्रुकला सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने आक्रमक खेळत चांगली साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही रचली. पण त्यांची भागीदारी 72 धावांची झाली असतानाच मार्करमला 13 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने बाद केले. मार्करमने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

मार्करम बाद झाल्यानंतर ब्रुकला अभिषेक शर्माने साथ दिली. ब्रुक आणि अभिषेक यांच्यातही 33 चेंडूतच 72 धावांची भागीदारी झाली. पण आक्रमक खेळणाऱ्या अभिषेकला १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रसेलने 32 धावांवर बाद केले. दरम्यान, ही विकेट घेतल्यानंतर रसेल क्रँम्प आल्याने मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे त्याच्या या षटकातील उर्वरित पाच चेंडू शार्दुल ठाकूरने टाकले.

दरम्यान, अखेरच्या षटकात ब्रुकने त्याचे पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. हे आयपीएल 2023 हंगामातील देखील पहिले शतक ठरले. त्याने 55 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार मारले. तसेच हेन्रिक क्लासेन 6 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्र रसेलने 3 विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com