IPL 2023: फलंदाजांनी ठोकलं, मग गोलंदाजांनी रोखलं! गुजरातकडून मुंबईचा दारुण पराभव

आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात दारुण पराभव केला.
Gujarat Titans
Gujarat TitansDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Titans vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी गुजरात टाटयन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने 55 धावांनी विजय मिळवला आहे.

हा गुजरातचा या हंगामातील 7 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला आहे. मात्र मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. हंगामातील एकूण 35 सामन्यांनंतर आता गुणतालिकेत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर विजयासाठी 208 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावाच करता आल्या.

Gujarat Titans
IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून झाली चूक, मग BCCI नेही केली कॅप्टन वॉर्नरवर कारवाई

या सामन्यात गुजरातने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली होती. पण, डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा 8 चेंडूत केवळ 2 धावा करून बाद झाला.

त्यानंतर ईशान किशन आणि कॅमेरॉन ग्रीनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ईशानला 8 व्या षटकात राशीद खानने 13 धावांवर माघारी धाडले. याच षटकात राशीदने तिलक वर्मालाही 2 धावांवर बाद केले. काही वेळात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कॅमेरॉन ग्रीनला 11 व्या षटकात्या दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने त्रिफळाचीत केले. ग्रीनने 33 धावांची खेळी केली.

ग्रीननंतर नूर अहमदने याच षटकात चौथ्या चेंडूवर धोकादायक टिम डेव्हिडलाही परतीचा रस्ता दाखवला. डेव्हिड भोपळाही फोडू शकला नाही. अनुभवी सूर्यकुमार यादवही खास काही करू शकला नाही. तो देखील 12 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.

पण, यानंतर नेहल वढेराला पीयुष चावलाने साथ देण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये 45 धावांची भागीदारी झाली. यामुळे मुंबईला किमान 130 धावांचा टप्पा पार करता आला. पण 18 व्या षटकात हे दोघेही बाद झाले. नेहलने मुंबईकडून या डावात सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तसेच पीयुषने 18 धावांवर धावबाद झाला. अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकरला 13 धावांवर मोहित शर्माने बाद केले.

गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच राशीद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याने 1 विकेट घेतली. त्याचबरोबर मोहम्मद शमीला विकेट मिळाली नसली, तरी त्याने चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 18 धावा दिल्या.

Gujarat Titans
IPL 2023: अन् वॉर्नरने थेट भूवीचे पायच धरले! जुन्या मित्रांच्या Video ने जिंकली लाखो मनं

तत्पुर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीला बोलावले होते. गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र साहाला अर्जुन तेंडुलकरने तिसऱ्याच षटकात 4 धावांवर बाद केले. पण त्यानंतर हार्दिकने तिसऱ्या क्रमांकावर येत गिलची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक 7 व्या षटकात पीयुष चावलाविरुद्ध मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात 13 धावांवर बाद झाला.

पण नंतर विजय शंकर आणि गिल यांच्यात भागीदारी रंगत होती. या भागीदारी दरम्यान गिलने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर त्याला लगेचच कुमार कार्तिकेयने १२ व्या षटकात माघारी धाडले. गिलने 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावा केल्या. पुढच्याच षटकात विजय शंकरही 19 धावांवर बाद झाला.

पण यानंतर मात्र, ड़ेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी तुफानी फटकेबाजी करताना गुजरात मोठी धावसंख्या उभारेल याची काळजी घेतली. या दोघांनी 71 धावांची भागीदारीही केली.

त्यांची भागीदारी 19 व्या षटकात रिली मॅरिडेथने अभिनवला 42 धावांवर बाद करत तोडली. पण मिलरने त्याचा आक्रमक पवित्रा कायम ठेवताना गुजराला 200 धावांचा आकडा पार करून दिला. तो अखेरच्या षटकात 46 धावा करून बाद झाला. दरम्यान, अखेरीस फलंदाजीला उतरलेल्या राहुल तेवतियानेही ३ षटकारांसह नाबाद 20 धावा केल्या. त्यामुळे गुजरातने 20 षटकात 6 बाद 207 धावा केल्या.

मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्जुन तेंडुलकर, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि रिली मॅरिडेथने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com