IPL 2023: पंजाबचा शेवटच्या बॉलवर चेन्नईला घरचा आहेर! धवनचे शेर ठरले थालाच्या धुरंधरानां वरचढ

CSK vs PBKS: रविवारी पंजाब किंग्सने अखेरच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्सला पराभवचा धक्का दिला.
Punjab Kings
Punjab KingsDainik Gomantak
Published on
Updated on

Chennai Super Kings vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने अखेरच्या चेंडूवर 4 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा 9 सामन्यांमधील चौथा पराभव ठरला आहे, तर पंजाबचा पाचवा विजय ठरला.

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवेच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्ससमोर 201 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 20 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला.

या सामन्यात अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी 9 धावांची गरज होती. त्यावेळी सिकंदर रझा आणि शाहरुख खान फलंदाजी करत होते. चेन्नईकडून मथिशा पाथिराना गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर रझाने एक धाव घेतली. त्यानंतर शाहरुखने एक धाव काढली. तिसऱ्या चेंडू पाथीरानाने निर्धाव टाकला.

त्यामुळे 3 चेंडूत 7 धावा असे समीकरण होते. पण चौथ्या चेंडूवर रझाने शाहरुखसह दुहेरी धावा धावल्या. पाचव्या चेंडूवरही त्यांनी दुहेरी धावा घेतल्या. मात्र, अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती.रझाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला. तिक्षणा चेंडू पकडण्यासाठी धावला. पण त्याने चेंडू पकडून परत फेकेपर्यंत रझा आणि शाहरुखने तीन धावा धावत पंजाबला विजय मिळवून दिला.

Punjab Kings
IPL 2023: मार्कंडेच्या कॅचने फिरवली मॅच! धोकादायक सॉल्टला असं केलं आऊट, पाहा Video

दरम्यान या सामन्यात 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून सलामीला प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवन उतरले होते. त्यांनी आक्रमक खेळत पंजाबला चांगली सुरुवात दिली. पण चांगल्या सुरवातीनंतरही शिखर 28 धावांवर पाचव्या षटकात तुषार देशपांडेविरुद्ध खेळताना बाद झाला.

पण त्यांनंतरही प्रभसिमरनने आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. पण त्याला रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर 9 व्या षटकात एमएस धोनीने यष्टीचीत केले. प्रभसिमरनने 24 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ काहीवेळात अर्थर्व तायडेही 13 धावा करून जडेजाविरुद्धच खेळताना बाद झाला.

मात्र त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांची जोडी जमली. या दोघांनीही पंजाबचा डाव सांभाळताना 57 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, लिव्हिंगस्टोनचा आक्रमक अंदाजही पाहायला मिळाला. पण त्यांची जोडी १६ व्या षटकात तुषार देशपांडेने तोडली. त्याने धोकादायक लिव्हिंगस्टोनला ऋतुराज गायकवाडच्या हातून झेलबाद केले. पण तोपर्यंत लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 40 धावा करत पंजाबला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.

तो बाद झाल्यानंतर सॅम करनही 21 धावांवर बाद झाला. मात्र जितेश शर्माने आक्रमण केले होते. मात्र त्याची आक्रमक खेळी तुषारनेच संपवली. जितेशचा अप्रतिम झेल सब्स्टीट्यूट क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या शेख राशिदने सीमारेषेजवळ पकडला. जितेशने 10 चेंडूत 21 धावा केल्या. अखेर सिकंदर रझाने शाहरुषला साथीला घेत सामना पंजाबला जिंकून दिला. रझा 13 धावांवर आणि शाहरुख 2 धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या आणि मथिशा पाथिरानाने एक विकेट घेतली.

Punjab Kings
IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचदरम्यान फॅन्समध्ये राडा! मारामारी करतानाचा Video व्हायरल

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यांनी पंजाबच्या गोलंदाजांना 9 व्या षटकापर्यंत यष मिळू दिले नव्हते. मात्र, त्यांची भागीदारी रंगलेली असतानाच ऋतुराज 31 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याला सिकंदर रझाने बाद केले.

मात्र, कॉनवेने त्याची लय कायम ठेवली होती. त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने चांगली साथ दिली होती. पण त्यांची भागीदारी धोकादायक ठरण्यापूर्वी 14 व्या षटकात अर्शदीपने दुबेला बाद केले. दुबेने 17 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्यानंतर काहीवेळात मोईन अली 10 धावा करून बाद झाला.

त्यामुळे रविंद्र जडेजा फलंदाजीला आला. त्याने आयपीएल 2023 मधील पाचवे अर्धशतक करून शानदार खेळणाऱ्या कॉनवेला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. पण अखेरच्या षटकात एमएस धोनीने फलंदाजीला येत तडखा दिला. त्याने अखेरच्या दोन चेंडूत दोन षटकार मारले. त्यामुळे चेन्नईने 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या.

मात्र, कॉनवेचे शतक थोडक्यात हुकले. कॉनवे 52 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 92 धावांवर नाबाद राहिला. तसेच धोनी 13 धावांवर नाबाद राहिला.

पंजाबकडून अर्शदीप सिंग, सिकंदर रझा, राहुल चाहर आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com