Chennai Super Kings vs Gujarat Titans, IPL 2023 Final: इंडियन प्रीमियर प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना होत आहे. अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. दरम्यान रविवारी पाऊस पडल्याने सोमवारी राखीव दिवशी हा सामना होत आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.
या सामन्यासाठी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, मथिशा पाथिराना आणि महिश तिक्षणा हे चार परदेशी खेळाडू आहेत. तसेच गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड मिलर, राशीद खान आणि नूर अहमद तीन परदेशी खेळाडू आहेत.
त्यामुळे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेइर म्हणून केवळ भारतीय खेळाडूलाच खेळवता येणार आहे. तसेच गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन परदेशी खेळाडू असल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी आणि भारतीय खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.
इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी गुजरातने राखीव खेळाडूमध्ये जोशुआ लिटिल, केएस भरत, ओडियन स्मिथ, साई किशोर आणि शिवम मावी यांना संधी दिली आहे. तसेच चेन्नईने राखीव खेळाडूंमध्ये शिवम दुबे, मिचेल सँटेनर, सुभ्रांशु सेनापती, शेख राशिद यांना संधी दिली आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक /कर्णधार), दीपक चाहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा
हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज अंबाती रायुडूचा अखेरचा आयपीएल सामना असणार आहे. तो या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अंबाती रायुडू 2010 पासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याने मुंबई इंडियन्सकडून 2013, 2015 आणि 2017 मध्ये, तर चेन्नई सुपर किंग्सकडून 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
दरम्यान, या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स खेळणार असून गुजरात टायटन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद जिंकले, तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरातने विजेतेपद जिंकले, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.
चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच गुजरातने गेल्यावर्षी पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.