IPL 2023 Update: इंडियन प्रीमियर लीग 2023 आता रोमांचक टप्प्यात आली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व संघांमध्ये चूरस पाहायला मिळत आहे. पण याचवेळी काही खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर होत असल्याने काही संघांना धक्काही बसत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच त्यांना एक धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला एन्रिच नॉर्किया शुक्रवारी रात्री उशीरा मायदेशी म्हणजेच दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. याबद्दल दिल्ली संघाकडून माहती देण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सांगितले की त्याला वैयक्तिक कारणामुळे तातडीने मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे तो शनिवारी संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, तो आता परतणार आहे की नाही, याबद्दल माहिती मिळालेली नाही.
साल 2020 पासून नॉर्किया आयपीएलमध्ये खेळत असून तो दिल्ली संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्याला 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना ही दुखापत झाली. त्यामुळे आता त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तो उर्वरित आयपीएल 2023 हंगामातून तसेच जूनमध्ये होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे.
दरम्यान, त्याच्याऐवजी लखनऊने आयपीएल 2023 स्पर्धेसाठी करुण नायरची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या करूण नायर भारताचा कसोटीतील दुसरा त्रिशतकवीर आहे. त्याने 2016 साली इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत त्रिशतक केले होते.
तसेच करूणला आयपीएल खेळण्याचाही चांगला अनुभव आहे. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 76 सामने खेळले असून 10 अर्धशतकांसह 127.75 च्या स्ट्राईक रेटसह 1496 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.