WTC 2023 Final: जडेजा की अश्विन, 2 की 3 पेसर, कसे असणार टीम इंडियाचं कॉम्बिनेशन? पाहा संभावित Playing XI

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, याचा घेतलेला आढावा.
WTC Final 2023 | Team India
WTC Final 2023 | Team IndiaDainik Gomantak

WTC 2023 Final, India's Predicted Playing 11: बुधवारपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची, ही मोठी डोकेदुखी कर्णधार रोहित शर्मा आणि संघव्यवस्थापनला आहे.

फलंदाजी फळी जवळपास निश्चित

अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील फलंदाजी फळी जवळपास निश्चित आहे. सलामीला कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल खेळू शकतो. गिल यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतके केली आहेत.

तसेच मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळू शकतात. या तिघांकडेही कसोटीचा मोठा अनुभव असल्याचे त्यांची कामगिरी या सामन्यात महत्त्वाची ठरू शकते.

WTC Final 2023 | Team India
Weather Report: पावसामुळे राखीव दिवशी खेळ? WTC Final ड्रॉ किंवा टाय झाली, तर विजेता कोण, जाणून घ्या

यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी?

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारताकडे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन आणि केएस भरत असे दोन पर्याय आहेत. ईशानचे अद्याप कसोटी पदार्पण झालेले नाही, पण केएस भरत फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळला आहे.

आता अंतिम सामन्यासाठी या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे. दरम्यान, केएस भरतला पहिली पसंती मिळण्याची शक्यता दाट आहे. त्याच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभवही आहे. तसेच त्याचे यष्टीरक्षण कौशल्यही चांगले आहे.

गोलंदाजी फळीत संधी मिळणार कोणाला?

भारतीय संघव्यवस्थापनासमोर सर्वात मोठे आव्हान गोलंदाजी फळी निवडण्याचे आहे. कारण सामना इंग्लंडमध्ये होणार असल्याने आणि ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार, हे स्पष्ट आहे.

पण आता प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन की चार वेगवान गोलंदाज खेळवायचे हा प्रश्न भारतीय संघासमोर आहे. जर चार वेगवान गोलंदाज खेळवले, तर मात्र भारताला एकच फिरकी गोलंदाज खेळवता येणार आहे.

WTC Final 2023 | Team India
MS Dhoni tips to KS Bharat: WTC फायनलसाठी केएस भरतला धोनीने काय दिल्या टीप्स? स्वत:च केलाय खुलासा

सध्या भारताकडे फिरकी गोलंदाजीसाठी आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा समावेश आहे. पण जर एकाच फिरकी गोलंदाजाला संधी मिळणार असले, तर जडेजाला अधिक पसंती दिली जाऊ शकते. अश्विनही चांगला पर्याय आहे, मात्र डावखुरा गोलंदाज आणि फलंदाजीची चांगली क्षमता या गोष्टी जडेजासाठी जमेची बाजू आहेत. तसेच त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे.

तसेच जर भारताने तीन वेगवान गोलंदाज खेळले, तर अक्षर पटेलआधी आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनाही संधी दिली जाऊ शकते. या दोघांनाही चांगला अनुभव आहे. तसेच अक्षरही जडेजाप्रमाणे डावखुरा गोलंदाज असल्याने जडेजाला अधिक पसंती दिली जाऊ शकते.

याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या तिघांनाही चांगला अनुभव असून ते चांगल्या फॉर्ममध्येही आहेत.

दरम्यान, जर चौथा वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली, तर शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. जयदेव उनाडकट देखील पर्याय आहे. मात्र, शार्दुलचा अनुभव आणि त्याच्यातील फलंदाजीची क्षमता पाहाता, त्याला संधी दिली जाऊ शकते.

असा असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर / आर अश्विन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com