Sarabjot Singh and TS Divya win the gold medal: भारतासाठी क्रीडा विश्वातून एक आनंदाची बातमी येत आहे. गुरुवारी (11 मे) बाकूमध्ये झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात भारताच्या दिव्या सुब्बाराजू थाडिगोल आणि सरबज्योत सिंग या जोडीने सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र संघ प्रकारात ही कामगिरी नोंदवली.
दिव्या आणि सरबज्योत या जोडीने सार्बियाच्या जोराना अरुनोविच आणि दामिर मिकेच या जोडीला 16-14 अशा फरकाने मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दिव्या आणि सरबज्योत याआधी कायरो आणि भोपाळ या ठिकाणी झालेल्या विश्वचषकाच्या फेऱ्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली होती.
दरम्यान, या सुवर्णपदासह भारतीय संघ नेमबाजी विश्वचषकाच्या गुणतालिकेत कजाकिस्थानसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदकासह इटली अव्वल क्रमांकावर आहे. तसेच एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकासह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेत भारतीय दिव्या आणि सरबज्योत यांनी 55 संघांच्या क्वालिफिकेशनमध्ये 581 गुण मिळवत अव्वल क्रमांकावर राहिली होती. त्यामुळे त्यांनी सुवर्णपदकाच्या सामन्यात स्थान मिळवत पदक निश्चित केले होते.
दरम्यान क्वालिफिकेशन फेरीत दिव्या आणि सरबज्योत यांच्यासह तीन जोड्यांचे गुण 581 होते. पण दिव्या आणि सरबज्योत यांनी 10 गुणांच्या सर्कलच्या आतल्या भागात 24 निशाणे लगावले होते. त्यामुळे ते अव्वल क्रमांकावर राहिले, तसेच दामिर आणि जोराना यांनी 19 निशाणे आतल्या मागात मारत दुसरा क्रमांक मिळवला, तर तुर्कीच्या जोडीने 16 निशाणे आतल्या बाजूला मारले होते.
दिव्या आणि सरबज्योत यांनी अंतिम सामन्यात पहिल्या सिरीजमध्ये 10.5 गुणांच्या दोन समान स्कोरसह 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतरच्या 13 सिरीजनंतर दोन्ही जोड्या 14-14 अशा बरोबरीत होत्या.
15 व्या सिरिजनंतर विजेता निश्चित होणार होता. यावेळी सरबज्योतने 10.6 असे गुण मिळवले, तर दिव्याने 9.9 गुण मिळलले. तसेच सार्बियाच्या दामिरने 10.3 गुण मिळवले, तर जोराना 8.6 गुणच मिळवू शकल्याने भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित झाले. सरबज्योतचे हे आयएसएसएफ विश्वचषकातील सलग दुसरे सुवर्णपदक आहे.
त्याने याआधी भोपाळमध्ये वैयक्तिक एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. दिव्याचे हे वरिष्ठ स्तरावरील पहिले पदक आहे. दरम्यान, सिमल यिलमाज आणि इस्माईल केलेस या तुर्कीच्या जोडीने इटलीच्या सारा कोस्टेनटिनो आणि पावलो मोना या जोडीला पराभूत करत कांस्य पदक जिंकले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकू विश्वचषकात भारताचे पदकांचे खाते बुधवारी उघडले होते. बुधवारी रिदम सांगवानने महिला 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.