India vs Australia Hockey: निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेतील आव्हानही कायम

भारतीय हॉकी संघाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून आपले आव्हान कायम राखले आहे.
India Hockey Team
India Hockey TeamDainik Gomantak

India vs Australia Hockey: भारतीय हॉकी संघाने बुधवारी यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 4-3 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेतील आपले आव्हानही कायम केले आहे. तरी अजूनही ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकाने पुढे आहे.

तिसऱ्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग(12'), अभिषेक (47'), शमशेर सिंग (57') आणि आकाशदीप सिंग (60') यांनी गोल केले, तर ऑस्ट्रेलियाकडून जॅक वेल्च (25'), अरान झालेव्स्की (32') आणि नॅथन इफ्रॉम्स (59') यांनी गोल केले.

India Hockey Team
India Vs Australia Hockey: तब्बल 11 गोलची नोंद झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

या सामन्यात भारताने पहिल्याच क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकलले होते. 12 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करण्यात यश मिळवले. त्याने जोरदार ड्रॅगफ्लिक करत भारतासाठी पहिला गोल नोंदवला, तर त्याचा या मालिकेतील एकूण चौथा गोल नोंदवला.

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला बरोबरी करण्याची संधी सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नरच्या रूपात मिळाली होती. परंतु, भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने गोल अडवला. त्याने नंतरही ऑस्ट्रेलियाचे काही प्रयत्न सुरेंदरच्या मदतीने रोखले. पण 25 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरची संधी ऑस्ट्रेलियाने साधली आणि सामन्यात बरोबरी झाली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये झालेव्स्कीने ऑस्ट्रेलियासाठी सुरुवातीलाच गोल केला आणि संघाला आघाडीही मिळवून दिली. पण, त्यानंतरही भारताने हार न मानता प्रयत्न चालू ठेवले.

चौथा आणि अखेरचा क्वार्टर मात्र रोमांचकारी ठरला. 47 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून अभिषेकने शानदार गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 10 मिनिटांनी शमशेर सिंगने भारतासाठी तिसरा गोल केला आणि भारत आघाडीवर आला.

पण तरी भारताचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि ऑस्ट्रेलियाने दोन मिनिटातच 59 व्या मिनिटाला तिसरा गोल करून बरोबरी साधली. पण भारतानेही शेवटपर्यंत हार मानली नाही आणि 60 व्या मिनिटाला मनदीप सिंगच्या मदतीने आकाशदीपने भारतासाठी चौथा गोल नोंदवला आणि भारताचा विजय पक्का केला.

आता या मालिकेतील चौथा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे, तर पाचवा आणि अखेरचा सामना 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com