Women's T20 World Cup Semi-Final: भारतीय महिला संघाला गुरुवारी महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट सामन्याला वळण देणारी ठरली.
भारतीय संघाला 32 चेंडूत 40 धावांची गरज असताना आणि हरमनप्रीतची ऋचा घोषबरोबर चांगली भागीदारी होत असतानाच ती धावबाद झाली. 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुहेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात तिला धावबाद व्हावे लागले. ऍश्ले गार्डनरने केलेल्या थ्रोवर ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हेलीने ती क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वीच स्टंपवरील बेल्स उडवल्या.
त्यामुळे हरमनप्रीत 34 चेंडूत 52 धावांवर बाद झाली. तिने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. ती बाद झाल्यानंतर भारताने ऋचा घोष (14), स्नेह राणा (11) आणि राधा यादव (0) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. तसेच दीप्ती शर्मा 20 धावांवर नाबाद राहिली.
पण हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 167 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताचे वर्ल्डकपमधील आव्हानही संपुष्टात आले.
दरम्यान, हरमनप्रीतच्या धावबादने अनेक क्रिकेट चाहत्यांना 2019 साली झालेल्या पुरुष वनडे वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्याची आठवण झाली. त्या सामन्यातही न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी 9 चेंडूत भारताला 24 धावांची गरज असताना धावबाद झाला होता.
विशेष म्हणजे त्या सामन्यात धोनीही दुहेरी धावा घेण्याच्या प्रयत्नात मार्टिन गप्टीलने केलेल्या थ्रोवर धावबाद झाला होता. त्यानेही 72 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच रविंद्र जडेजाबरोबर 116 धावांची भागीदारी रचली होती. जडेजा बाद झाल्यानंतर धोनी धावबाद झाला होता.
धोनी बाद झाल्यानंतर भारताने पुढच्या 6 चेंडूतच भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलच्या विकेट गमावल्याने भारताचा डाव 49.3 षटकात 221 धावांवरच संपुष्टात आला आणि भारतीय संघाला 18 धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे भारताचे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न भंगले होते.
योगायोग असा की 2019 वर्ल्डकप आणि 2023 टी20 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात धावबाद होणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि एमएस धोनी या दोघांचाही जर्सी क्रमांक 7 आहे आणि या दोघांनीही अर्धशतक केल्यानंतर धावबादच्या स्वरुपात विकेट गमावली. या दोघांच्याही विकेट सामन्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.