Ind Vs Nz T-20: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 65 धावांनी मात केली. भारताच्या 192 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडचा संघाचा डाव 126 धावांत आटोपला. भारताच्या दीपक हुडा याने 2.5 षटकांत 10 धावा देत 4 विकेट घेतल्या. या सीरीजमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे वाहून गेल्याने या दुसऱ्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले होते. आता अखेरचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अतिशय खराब झाली. विस्फोटक फिन ऍलन खाते न उघडताच बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला अर्शदीप सिंगकडे झेलबाद केले. त्यानंतर केन विल्यमसन आणि डेव्हन कॉनवे यांनी अर्धशतकी भागीदारी केली. 56 धावांवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली.
वॉशिंग्टन सुंदरने डेव्हन कॉनवेला बाद केले. कॉनवेने 22 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर युझवेंद्र चहलने ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. फिलिप्सने सहा चेंडूंत 12 धावा केल्या. चहलने त्याला क्लीन बोल्ड केले. केन विल्यमसन याने 61 धावा केल्या. पण न्युझीलंडच्या शेपटाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांचे पाच फलंदाज एकेरी धावसंख्येवर आऊट झाले.
तत्पुर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताची पहिली विकेट 36 धावांवर पडली आहे. ऋषभ पंत 13 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. दरम्यान, 6.4 ओव्हरमध्ये भारताचा 1 आऊट 50 झाला असताना पावसाला सुरवात झाली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे 27 मिनिटांचा खेळ वाया गेला असला तरी षटकांच्या संख्येत कोणतीही घट करण्यात आलेली नाही.
इशान किशन 31 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. भारताची तिसरी विकेट 108 धावांवर पडली. श्रेयस अय्यर हिट विकेटवर आऊट झाला. त्याने नऊ चेंडूत 13 धावा केल्या. त्यानंतर भारताचा मिस्टर 360 डीग्री सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी डाव सांभाळला. सूर्यकुमार यादवने अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने नाबाद 111 धावांची वादळी खेळी केली.
त्याच्यामुळेच भारताला 191 धावसंख्या करता आली. तथापि, अखेरच्या षटकात टीम साऊदी याने भारताच्या तीन फलंदाजांना आऊट करत हॅटट्रिक साधली. त्याने हार्दिक पंड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर यांना लागोपाठच्या चेंडुंवर आऊट केले. साऊदीने टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा हॅटट्रिक केली. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.