India Women vs Australia Women, Test Match at Wankhede Stadium, Mumbai:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात गुरुवारपासून (21 डिसेंबर) कसोटी सामना सुरु झाला आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियासाठी या सामन्याची सुरुवात खराब झाली. या ऑस्ट्रेलियाची 20 वर्षीय प्रतिभावान फलंदाज फोबी लिचफिल्ड एकही चेंडू न खेळता पहिल्याच षटकात धावबाद झाली.
झाले असे की पहिल्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी रेणूका सिंग आली, तर ऑस्ट्रेलियाकडून लिचफिल्ड आणि बेथ मूनी सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मूनीने बॅकवर्ड पाँइंटला शॉट खेळला. त्यावर मूनी आणि लिचफिल्डने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, जेमिमाह रोड्रिग्सने चपळाईने चेंडू पकडत तो स्ट्रायकर एन्डला फेकला. त्यावेळी यष्टीरक्षक यास्तिका भाटियाने स्टंपवरील बेल्स उडवर लिचफिल्डला धावबाद केले. ज्यावेळी लिचफिल्ड धावबाद झाली, त्यावेळ तिने एकही चेंडू खेळला नव्हता. त्यामुळे तिला डायमंड डकवर बाद होत माघारी परतावे लागले.
दरम्यान, तिच्यानंतर दुसऱ्याच षटकात एलिस पेरीला पुजा वस्त्राकरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे पहिल्या दोनच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले. यानंतरही ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 77.4 षटकात 219 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून ताहलिया मॅकग्राने 50 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच मूनीने 40 धावा केल्या, तर कर्णधार एलिसा हेलीने 38 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
भारताकडून पुजा वस्त्राकरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर स्नेह राणाने 3 विकेट्स घेतल्या आणि दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.