

अहमदाबाद: मोठी भागीदारी करण्यात आलेले अपयश मुळावर आले, अशी खंत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केली. भारताकडून हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी केलेली ३५ धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली; परंतु त्याअगोदर ५ बाद ५१ अशी अवस्था होऊन सामना हातून निसटला होता.
या तुलनेत आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि ब्रेविस यांनी पाचव्या विकेटसाठी ५१ चेंडूत ९७ धावांची भागीदारी करून आफ्रिकेच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली होती.
पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नसतो; परंतु पॉवरप्लेमध्ये अधिक फलंदाज बाद झाल्यावर सामना गमावला जातो, याचे भान ठेवायला हवे. आमच्याकडून चांगल्या भागीदारी झाल्या नाहीत. यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी करता आली असती, अशी निराशा सूर्यकुमारने व्यक्त केली.
हा मोठा पराभव झाल्यामुळे भारताची निव्वल सरासरी - ३.८०० अशी झाली आहे. याचा फटका कदाचित उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवताना होऊ शकतो.
कधी कधी पूर्ण अपेक्षाभंग होत असतो हे खरे असले तरी हा खेळाचा भाग आहे. आम्ही यातून धडा घेऊ आणि तेवढ्याच जोमाने परतू. उत्तम फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण आमच्याकडून होईल अशी अपेक्षा बाळगतो, असे सूर्यकुमार म्हणाला.
फलंदाजीबाबत निराशा व्यक्त करीत असताना सूर्यकुमारने जसप्रीत बुमरा (३/१५) आणि अर्शदीप सिंग (२/२८) यांचे कौतुक केले. या दोघांच्या प्रयत्नांमुळे आम्ही आफ्रिकेची धावसंख्या दोनशेपार होऊ दिली नाही,
असे सांगून सूर्यकुमार म्हणाला, सामन्याच्या सुरुवातीला १ ते ६ षटकांमध्ये आमचे वर्चस्व होते; परंतु सातव्या षटकापासून मिलर आणि ब्रेविस यांनी सामना आमच्या हातून दूर केला, असे विश्लेषण सूर्यकुमारने केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.