

India vs Pakistan Handshake Controversy: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची तारीख जवळ येत असतानाच, मैदानाबाहेरच्या वादाने आता शिखर गाठले आहे. पाकिस्तानने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती, परंतु आयसीसीच्या कडक पवित्र्यानंतर पीसीबीला माघार घ्यावी लागली. आता या सामन्याबाबत क्रिकेट वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे, तो म्हणजे 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन (Handshake) करणार का?
वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीसोबत झालेल्या बैठकीत भारतीय खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन करावे, अशी अजब अट ठेवली होती. मात्र, आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना मोठा धक्का दिला.
आयसीसीने स्पष्ट केले की, खेळाडूंनी हस्तांदोलन करावे की नाही, हे पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असते आणि कोणताही नियम खेळाडूंना यासाठी सक्ती करु शकत नाही. हे आयसीसीच्या अधिकारक्षेत्राबाहेरचे असल्याचे सांगत जागतिक क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या क्रीडा संबंधांबाबत कठोर भूमिका घेतली. या घटनेनंतर झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने 'नो हँडशेक' परंपरेची सुरुवात केली, ज्याचे पडसाद नंतर महिला विश्वचषक, रायझिंग स्टार्स आशिया चषक आणि अंडर-19 विश्वचषकातही उमटले.
पाकिस्तानने या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा रंग देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही. बांगलादेशच्या नावाखाली भारताची कोंडी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही फसला असून, आता ते स्वतःच सर्व बाजूंनी घेरले गेले आहेत. भारतीय खेळाडूंनी वारंवार हे दाखवून दिले की, जोपर्यंत सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत मैदानावर केवळ औपचारिक खेळ होईल, पण मैत्रीपूर्ण संबंध दाखवणारे हस्तांदोलन टाळले जाईल. कोलंबोमध्ये होणाऱ्या या सामन्यातही टीम इंडिया आपली हीच 'नो हँडशेक' परंपरा कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानने (Pakistan) घातलेली ही अट त्यांच्या असुरक्षिततेचे प्रतीक मानले जात आहे. क्रिकेट जगतात यावर जोरदार टीका होत असून, खेळाडूंना हात मिळवण्यासाठी बाध्य करणे हे खेळाच्या नियमांविरुद्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महामुकाबल्यात केवळ धावांचा पाऊस किंवा विकेट्सचा थरारच पाहायला मिळणार नाही, तर भारतीय खेळाडूंच्या या करारी भूमिकेकडेही संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहणार आहे. पाकिस्तानला आता हे स्पष्ट झाले आहे की, आयसीसी देखील या विषयात भारतावर दबाव आणू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.