

IND vs NZ 3rd ODI: भारत-न्यूझीलंड यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. मालिकेत पराभवाचा सामना करत असतानाच न्यूझीलंडच्या संघाला आता एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला, तर वेलिंग्टन वनडेदरम्यान हेल्मेटवर चेंडू लागल्यामुळे ब्लेयर टिकनरला पुढील सात दिवसांसाठी मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. डेव्हॉन कॉनवे आधीच मालिकेतून बाहेर गेलेला असताना या नव्या दुखापतींमुळे न्यूझीलंडच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकी फर्ग्युसन टी20 मालिकेत झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. दुसरीकडे, आयसीसीच्या नियमानुसार डोक्याला चेंडू लागलेल्या ब्लेयर टिकनरला सात दिवसांचा अनिवार्य प्रोटोकॉल पाळावा लागणार असल्याने तो पुढील दोन्ही सामन्यांना मुकणार आहे. या पार्श्वभूमीवर हॅमिलटन येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वीच बॉलिंग ऑलराउंडर क्रिस्टियन क्लार्कचा संघात समावेश करण्यात आला. तसेच, वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला चौथ्या सामन्यात संघात पुनरागमन करण्याचा सल्ला देण्यात आला असून, मॅट हेन्री आणि काइल जॅमिसन हे दोघेही आता चौथ्या वनडेपर्यंत संघासोबतच राहणार आहेत.
मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या (New Zealand) ताफ्यात आणखी दोन नवीन खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे. तिसऱ्या वनडेनंतर लगेचच टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लॅम फिलिप्स आणि नॅथन स्मिथ हे पाच प्रमुख खेळाडू आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होतील. सततच्या दुखापतींमुळे आणि मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे न्यूझीलंडच्या पुनरागमनाच्या आशेला मोठा सुरुंग लागला असून, आता उर्वरित मालिकेत युवा खेळाडूंच्या कामगिरीवर न्यूझीलंडचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.