India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणजेच चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंदोरला 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ आता एकत्र जमला असून सरावालाही सुरुवात केली आहे.
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीला झाला होता. हा सामना केवळ 3 दिवसातच संपला होता. त्यामुळे खेळाडूंना ज्यादा वेळ विश्रांतीसाठी मिळाला. दुसरा कसोटी सामना 19 फेब्रुवारीलाच संपला असल्याने तिसऱ्या कसोटीपूर्वी खेळाडूंना 9 दिवस मिळाले.
या काळात काही खेळाडू छोट्या सुटीवर जाऊन आले, तर काही खेळाडूंनी कुटुंबाबरोबर वेळ घालवायला प्राधान्य दिले. पण आता तिसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी सर्व खेळाडू एकत्र जमले आहेत.
नुकताच इंदोर कसोटीसाठी भारतीय संघ सराव करत असतानाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बॅटने बॉल मारताना दिसत आहे, त्यावर अन्य खेळाडू झेल घेण्याचा सराव करत आहेत.
बीसीसीआयने व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही लिहिले आहे की 'भारतीय संघ इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी त्यांचे झेल घेण्याच्या कौशल्याला आणखी धार लावत आहेत.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या चालू कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने तीन दिवसातच जिंकले आहेत. त्यामुळे भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखली आहे.
आता भारताने या मालिकेतील उर्वरित एक सामना जिंकला, तरी ते मालिकेत विजय मिळवतील, त्याचबरोबर भारताचे कसोटी चॅम्पियनशीप 2023 च्या अंतिम सामन्यातील जागाही पक्की होईल. पण ऑस्ट्रेलियाला या मालिकेतील पराभव टाळण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
दरम्यान, तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत तो खेळणार नाही. त्याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथ नेतृत्व करताना दिसणार आहे.
तसेच या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिशेल स्टार्क आणि कॅमेरॉन ग्रीन हे दोघेही पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. कारण हे दोघेही आता बोटाच्या दुखापतीतून सावरले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.