सिडनी : मेलबर्न येथील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकल्यामुळे शेपटीवर पाय पडलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची बिथरलेल्या सापासारखी अवस्था झाली आहे. भारतीय संघाला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आले आहे. अगोदर जैवसुरक्षा नियम मोडल्यावर पाच भारतीय खेळाडूंविरुद्ध उठवलेले रान आणि आता टणक आणि हिरवीगार खेळपट्टी तयार केली आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा सामना उद्यापासून सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. प्रथेप्रमाणे भारताने आपले ११ शिलेदार एक दिवस अगोदरच जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे. पहाटे सुरू झाला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ थांबविण्यात आला होता. परंतु, थोड्याच वेळात खेळपट्टीचे परिक्षण होऊन सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खेळ थांबविण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 ओव्हर्समध्ये 1 बाद 21 धावा झाल्या होत्या. मोहमम्द सिराजने डेव्हिड वॉर्नरला बाद करत पहिली विकेट घेतली.
खेळपट्टीवर हिरवे गवत
सिडनीची खेळपट्टी एरवी फिरकी गोलंदाजांना सहाय्य करणारी असते; पण या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर हिरवे गवत आहे. त्याचबरोबर खेळपट्टी टणकही असेल, असे क्यूरेटर ॲडम लुईस यांनी सांगितले. येथील पावसाळी हवामानामुळे आम्हाला खेळपट्टी तयार करण्यात अडथळे आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पाऊस असल्यामुळे खेळपट्टीवर आच्छादन काढता आले नव्हते. तीन दिवसांपूर्वी खेळपट्टीवर थेट सूर्यप्रकाश आला. त्यामुळे जास्तीत जास्त चांगली खेळपट्टी आम्ही तयार करू शकलो आहोत, असे ते म्हणाले.
भारताकडे दोन नवखे गोलंदाज
ईशांत शर्मानंतर, महम्मद शमी, उमेश यादव अशा अनुभवी वेगवान गोलंदाजांशिवाय भारताला खेळावे लागत आहे. त्यामुळे महम्मद सिराज आणि आता नवदीप सैनी अशा दोन नवख्या वेगवान गोलंदाजांसह भारताला लढावे लागणार आहे. या तुलनेत हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे मिशेल स्टार्क, पॅट कमिंस आणि जोश हेझलवूड असे अनुभवी गोलंदाज आहेत. परिणामी भारताची मदार जसप्रित बुमरावर असणार आहे.
लेगसाईडचा ट्रॅप
ऑस्ट्रेलियाच्या नावाजलेल्या फलंदाजीला भारतीय गोलंदाजांनी प्रामुख्याने अश्विनने लेग साईडचा ट्रॅप लावून जेरीस आणले. या जाळ्यात आपण अडकलो, याची जाणीव त्यांना झाली, हीपण गेल्या काही दिवसांत त्यांनी यावर मार्ग शोधणारा अभ्यास केला आहे. त्यामुळे अश्विन आपली दिशा आता बदलतो की कायम ठेवतो, हे महत्त्वाचे ठरणार
आहे.
भारत अंतिम 11 : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रित बुमरा, महम्मद सिराज, नवदीप सैनी.
रोहित शर्माचे पुनरागमन
विलगीकरण आणि जैव सुरक्षा चौकट असे अडथळे पार करून रोहित शर्मा कसोटी पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मयांक अगरवालला वगळून त्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो शुभमन गिलसह सलामीला खेळणार, हे निश्चित आहे.
लक्षवेधक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.