IND vs AUS: कांगारुंच्या सरावाच्या योजनेवर फिरले पाणी, दिग्गजाची ICC कडे कारवाईची मागणी
India vs Australia: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या ऑस्ट्रेलियाची भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील नागपूरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अडीच दिवसातच विजय मिळवला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सराव करण्याच्या योजनांवर पाणी पडले आहे.
झाले असे की भारताने शनिवारी विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राखेरपर्यंतच एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने हा सामना संपल्यानंतर विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला खेळपट्टी उघडी ठेवण्यास सांगितले होते. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ रविवारी सराव करू शकेल. मात्र, ग्राऊंड स्टाफने शनिवारी रात्री खेळपट्टीवर पाणी मारले. तसेच सरावाच्या खेळपट्ट्यांवरही पाणी मारल्याने ऑस्ट्रेलियाला सराव करण्याच्या योजना रद्द कराव्या लागल्या.
याबद्दल ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान हेली यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी या प्रकरणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लक्ष घालण्यास सांगितले आहे.
नागपूरला झालेल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 177 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 400 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे भारताला या डावात 223 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 91 धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून या सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या 20 विकेट्सपैकी आर अश्विनने 8 विकेट्स, रविंद्र जडेजाने 7 विकेट्स आणि अक्षर पटेलने 1 विकेट अशा मिळून फिरकी गोलंदाजांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, आता 17 मार्चपासून दिल्लीमध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मिशेल स्टार्क आणि कॅमेरॉन ग्रीन यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हे दोघेही दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळले नव्हते.
तसेच ऑस्ट्रेलिया संघात डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कन्हेमन दुसऱ्या कसोटीपूर्वी सामील झाला आहे. कारण त्यांचा फिरकीपटू मिशेल स्विप्सन त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.