India vs Australia 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या वनडे मालिका सुरू असून या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला होणार आहे. या सामन्याला रविवारी (19 मार्च) भारतीय प्रमाणवेळेनुसार 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.
पण वायएस राजा रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाचा फटका बसणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण सध्या भारतात अवकाळी पाऊस कोसळताना दिसून आला आहे.
रविवारी विशाखापट्टणला देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येऊ शकतो. या सामन्यादरम्यान विशाखापट्टणममधील तापमान 26 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी देखील विशाखापट्टणममध्ये पावसाच्या सरी कोसळून गेल्या आहेत. त्यामुळे आता वातावरण ढगाळ देखील राहू शकेल.
दरम्यान, या वनडे मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विशाखापट्टणमला होणारा दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा मानस असेल, तर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याबरोबरच आव्हान राखण्याच्या हेतूने ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल.
दुसऱ्या वनडे सामन्यातून भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल. तो पहिल्या वनडेसाठी मेव्हण्याच्या लग्नानिमित्त सुट्टी घेतल्याने अनुपस्थित होता. पण आता तो भारतीय संघात सामील झाला असून दुसऱ्या वनडेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
पहिल्या वनडेत रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केलेला हार्दिक पंड्या दुसऱ्या वनडेत उपकर्णधारपद सांभाळेल. दरम्यान, रोहितच्या पुनरागमनामुळे ईशान किशनला दुसऱ्या वनडेतून वगळले जाऊ शकते. या व्यतिरिक्त दुसऱ्या वनडेसाठी फलंदाजी फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.
तसेच दुसऱ्या वनडेसाठी गोलंदाजी फळीतही एक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शार्दुल ठाकूर ऐवजी उमरान मलिकला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या वनडेत शार्दुलला एकही विकेट घेता आली नव्हती. तसेच उमरानने आत्तापर्यंत त्याच्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला एक संधी दिली जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.