India vs Australia 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत भारताने मुंबईला झालेला पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला रविवारी (19 मार्च) होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
या सामन्यातून भारताचा नियमित कर्णधार संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तो भारतीय संघाचे नेतृत्व करतानाही दिसेल. त्याने पहिल्या वनडेतून मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. पण आता तो संघात परतणार आहे. त्याच्या ऐवजी पहिल्या वनडेत नेतृत्व केलेला हार्दिक पंड्या आता उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिलबरोबर ईशान किशनने सलामीला फलंदाजी केली होती. मात्र तो त्याची छाप सोडण्यात अपयशी ठरला. त्याला ३ धावांवरच मार्कस स्टॉयनिसने बाद केले होते. आता रोहित संघात परतल्याने तो सलामीला खेळताना दिसेल.
त्यामुळे दुसऱ्या वनडेसाठीच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून ईशान किशनला वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. या एका बदलाव्यतिरिक्त फलंदाजी फळीत तरी मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. शुभमन गिल सलामीसाठी कायम राहू शकतो.
तसेच मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल हे देखील कायम राहू शकतात. केएल राहुल यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळताना दिसेल. पहिल्या वनडेतही त्याने यष्टीरक्षण केले होते.
याशिवाय हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू फलंदाजीला सखोलता देतील. जडेजाने पहिल्या वनडेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आशा तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता.
पहिल्या वनडेत शार्दुल ठाकूरला संधी मिळाली होती. पण एकिकडे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स मिळवल्या असताना शार्दुलला मात्र एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्या वनडेसाठी उमरान मलिकच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.
उमरान मलिकने आत्तापर्यंतच्या छोट्याशा कारकिर्दीत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याचा वेग दुसऱ्या विशाखाट्टणमला होणाऱ्या सामन्यात महत्त्वाचा ठरू शकतो.
याशिवाय सिराज आणि शमी दुसऱ्या वनडेतही खेळताना दिसू शकतात. त्याचबरोबर कुलदीप यादवही संघात कायम राहण्याचीच दाट शक्यता आहे. गोलंदाजीत हार्दिक आणि जडेजाही चांगले योगदान देऊ शकतात.
दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, उमरान मलिक, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.