India vs Australia: भारतील क्रिकेट संघाने शनिवारी (११ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही मिळवली आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाला भारताची ही आघाडीही भरून काढता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 32.3 षटकात 91 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
भारताकडून दुसऱ्या डावात आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.
अश्विन - जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलिया गारद
तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला होता. मात्र, दुसऱ्याच षटकात अश्विनने उस्मान ख्वाजाला 5 धावांवर विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजाने मार्नस लॅब्युशेनचा (17) मोठा अडथळा दूर केला.
त्यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला फार काळ टिकूच दिले नाही. त्याने डेव्हिड वॉर्नर (10), मॅट रेनशॉ (2), पीटर हँड्सकॉम्ब (6) आणि ऍलेक्स कॅरे (10) यांना स्वस्तात बाद करत ऑस्ट्रेलियाला एका मागोमाग एक धक्के दिले.
यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला (1) बाद केले, तर अक्षर पटेलने टॉड मर्फीला (2) बाद केले. यानंतर नॅथन लायन (8) आणि स्कॉट बोलंड (0) यांच्या विकेट्स शमीने घेत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.
भारताचे शेपूट वळवळले
भारताने तिसऱ्या डावात पहिल्या डावातील 115 षटकांपासून 7 बाद 321 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी चांगली सुरुवात केली. मात्र जडेजाला टॉड मर्फीने त्रिफळाची केले. जडेजाने 185 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तसेच त्याने आठव्या विकेटसाठी अक्षरबरोबर 88 धावांची भागीदारी केली.
यानंतर अक्षरने मोहम्मद शमीला साथीला घेतले. शमीनेही आक्रमक खेळ करत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 37 धावा केल्या. त्याच्या आणि अक्षरमध्ये 9 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली. पण अक्षरने 174 चेंडूत 84 धावांची खेळी करून विकेट गमावली. त्यामुळे भारताचा पहिला डाव 139.3 षटकात 400 धावांवर संपुष्टात आला.
दरम्यान, या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही शानदार फलंदाजी करताना 120 धावांची शतकी खेळी केली. मात्र, भारताचे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव हे फार काही खास करू शकले नाहीत.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्सने 2 विकेट्स आणि नॅथन लायनने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर त्यांना पहिल्या डावात केवळ 177 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून या डावात मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.