IND vs SA: विजयाचं गिफ्ट! किंग कोहलीचे ऐतिहासिक शतक, टीम इंडियाने आफ्रिकेला दिली 243 धावांनी मात

ODI World Cup 2023 IND vs SA: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी धुव्वा उडवला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

ODI World Cup 2023 IND vs SA: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी धुव्वा उडवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 5 गडी गमावून 325 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 27.1 षटकांत 83 धावाच करु शकला. भारताकडून विराट कोहलीने शतक तर श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले.

बर्थडे बॉय विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 49 वे शतक झळकावून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (49) ठोकण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, 327 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची (South Africa) सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. क्विंटन डी कॉक 10 चेंडूत 5 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर कर्णधार टेम्बा बावुमाने 11 आणि एडन मार्करामने 9 धावा केल्या. सिराजने डी कॉकला क्लीन बोल्ड केले.

जडेजाने टेम्बाला तर शमीने मार्करामला एलबीडब्ल्यू केले. हेन्रिच क्लासेनला जडेजाने बाद केले. डुसेनला शमीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्यानंतर जडेजाने डेव्हिड मिलरला क्लीन बोल्ड केले. केशव महाराज आणि रबाडाला जडेजानेच बाद केले. कुलदीपने मार्को यान्सेन आणि एनगिडीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दुसरीकडे, भारताने चमकदार सुरुवात केली. रोहित शर्माने (Rohit Sharma) शुभमन गिलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकांत 63 धावा जोडल्या. मात्र, रोहितचे अर्धशतक हुकले. त्याने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. तर गिलचा डाव 11व्या षटकात संपला. त्याला केशव महाराजने बोल्ड केले.

गिलने 24 चेंडूत 23 धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यरने टीम इंडियाच्या डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. 37व्या षटकात अय्यर बाद झाल्यानंतर ही भागीदारी तुटली. एनगिडीने अय्यरला मार्करामकरवी झेलबाद केले.

त्याने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावा केल्या. केएल राहुल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलने 17 चेंडूत 8 धावा केल्या. यानंतर सूर्यकुमारने 14 चेंडूत 22 धावा केल्या. विराट कोहलीने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. जडेजाने 15 चेंडूत 29 धावांची स्फोटक खेळी खेळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com