

Team India World Record: टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सुवर्ण युगाची सुरुवात करत नवा इतिहास रचला. नुकत्याच खेळल्या गेलेल्या एका अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक सामन्यात टीम इंडियाने जपानचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. या सनसनाटी विजयासोबतच टीम इंडिया आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात जगातील अशी पहिलीच टीम बनली, जिने T20 क्रिकेटमध्ये यशस्वीपणे 200 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यामध्ये सुपर ओव्हरमधील विजयांचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी आहे, कारण टीम इंडियाने हा ऐतिहासिक टप्पा केवळ 291 सामन्यांमध्येच सर करुन दाखवला.
टीम इंडियाच्या (Team India) या विजयाचा प्रवास तसा रंजक आणि प्रेरणादायी राहिला. भारताने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरुवात 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळून आणि जिंकून केली होती. त्यानंतर आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताने 2017 मध्ये श्रीलंकेचा पराभव करत आपल्या 50 विजयांचा पल्ला गाठला होता. पुढे 2022 मध्ये वेस्ट इंडीजला मात देत टीम इंडियाने 100 विजयांची सेंच्युरी पूर्ण केली. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून भारताने 150व्या विजयाची नोंद केली आणि आता जपानविरुद्ध मिळवलेल्या या थरारक विजयासह भारताने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विजयांचा जादुई आकडा पूर्ण केला.
या जागतिक क्रमवारीत भारताच्या आसपासही दुसरा कोणताही देश नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे, ज्यांनी 299 सामने खेळून 174 विजय मिळवले. या तुलनेत टीम इंडियाने केवळ 291 सामन्यांतच 200 विजयांचा भीमपराक्रम करुन दाखवला, जो खरोखरच कौतुकास्पद आहे. या यादीत न्यूझीलंडचा संघ 137 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने 131 आणि इंग्लंडने 130 टी-20 सामने जिंकले आहेत. गेल्या जवळपास 20 वर्षांच्या या दिमाखदार क्रिकेट प्रवासात टीम इंडियाने अव्वल स्थान कायम राखत हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.
जपानविरुद्धची ही 200 वी विजयाची नोंद अत्यंत सोपी नव्हती, अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारताने ही डबल सेंच्युरी पूर्ण केली. पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे हा सामना 5-5 षटकांचा करण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 5 षटकांत 32 धावांचे आव्हान उभे केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना जपानचा संघ निर्धारित षटकांत केवळ 30 धावांपर्यंत मजल मारु शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना अवघ्या 2 धावांनी जिंकून टी-20 मध्ये 200व्या विजयाचा ऐतिहासिक पराक्रम केला. या विजयानंतर आता टीम इंडिया एशियन गेम्समध्ये आपली विजयी घौडदौड सुरु ठेवण्यासाठी सज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.