World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 मध्ये आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकदिवसीय विश्वचषकातही टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
भारताच्या चमकदार कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाच्या गोलंदाजांनी विरोधी संघांच्या फलंदाजांवर सतत दबाव राखणे. विश्वचषकात भारताने विरोधी संघाला दोनदा 100 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले आहे. यासह एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला आहे, जो याआधी कोणत्याही संघाला करता आला नव्हता.
दरम्यान, 2023 मधील भारतीय संघाच्या कामगिरीवर नजर टाकली तर आतापर्यंत त्यांनी विरोधी संघाला चार वेळा एकदिवसीय सामन्यात 100 धावांचा टप्पा ओलांडू दिलेला नाही. यामध्ये टीम इंडियाने या वर्षात तीन वेळा श्रीलंकेविरुद्ध आणि एकदा दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
2023 च्या सुरुवातीला त्रिवेंद्रमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला अवघ्या 73 धावांत गुंडाळले होते. यानंतर, आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला केवळ 50 धावांत गुंडाळले होते, तर एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा श्रीलंकेला 55 धावातंच गुंडाळले. तर चौथ्यांदा, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला आणि त्यांना अवघ्या 83 धावांत गुंडाळले.
भारताव्यतिरिक्त, एका वर्षात एकदिवसीय सामन्यात विरोधी संघाला 100 धावांच्या आत रोखण्याच्या बाबतीत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी वर्षभरात प्रत्येकी तीन वेळा हा पराक्रम केला आहे.
वेस्ट इंडिजने 1993 मध्ये, दक्षिण आफ्रिकेने 2006 मध्ये आणि श्रीलंका संघाने 2007 मध्ये ही कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात चार वेळा अशी कामगिरी करणारा भारत (India) हा पहिला संघ ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.