सिडनी : अखेरच्या षटकात धावगती उंचावत होती. भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी २० मधील विजयासाठी अखेरच्या १२ चेंडूंत २५ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने दहा चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत भारतास दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. पंड्याच्या या हार्दिक कामगिरीमुळे भारताने ट्वेंटी २० मालिकेत विजयी आघाडी घेतली.
खरे तर १५ चेंडूत ३५ धावांची गरज असताना श्रेयसने एक चौकार आणि एक षटकार खेचत अखेरच्या षटकातील आक्रमणाचा पाया रचला आणि हार्दिकने अखेरच्या षटकात चौदा धावांचे लक्ष्य चार चेंडूत पार करताना हार्दिकने मिडविकेटला दोन षटकार खेचले. हार्दिकच्या अंतिम हल्ल्याचा पाया शिखर धवनच्या धडाकेबाज अर्धशतकाने तसेच नटराजनने ऑस्ट्रेलिया डावात मोक्याच्या वेळी धावास वेसण घातल्याने रचला गेला होता.
पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख गोलंदाजांविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मदार फलंदाजीवर होती. ॲरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियास बदली कर्णधार मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करून दिली. तो बाद झाला एका गैरसमजुतीने. आपला झेल कोहली घेणार, हे समजून त्याने परतण्यास सुरुवात केली. कोहलीने झेल सोडला; पण वेडला धावचीत केले.
वेड परतल्यावर स्टीव स्मिथला भक्कम साथच लाभली नाही. त्याचे टायमिंगही चांगले नव्हते. शार्दूल ठाकूर, नटराजन तसेच अखेरच्या षटकातील वीस धावांचा अपवाद वगळता युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियास सव्वादोनशेच्या नजीक जाण्यापासून रोखले.
भारताने सिडनीतच क्रिकेटचे धडे गिरवलेल्या ॲबॉटच्या दोन षटकांत १७ धावा वसूल केल्या. वेडने त्यामुळे त्याच्याकडे गोलंदाजीच दिली नाही. त्याचा फायदा हार्दिकने अखेरच्या षटकात घेतला नसता तरच नवल होते. भारताने यामुळे दौऱ्यात सलग तिसरा विजय (एकदिवसीय मालिकेत तिसरा आणि ट्वेंटी २० मध्ये दोन) मिळवला.
असा झाला ऑस्ट्रेलियाचा डाव
असा झाला भारताचा डाव
"रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे प्रमुख खेळाडू नसतानाही आम्ही विजय मिळवत आहोत, हे जास्त सुखावणारे आहे. आयपीएलमधील अनुभवाचा नक्कीच फायदा होत आहे. कमी अंतरावरील सीमारेषा असूनही धावसंख्या आवाक्यात ठेवू शकलो. चेंडू फटकावण्याच्या क्षमतेमुळे चार वर्षांपूर्वी हार्दिक संघात आला होता. आता आगामी चार-पाच वर्षे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देऊ शकणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. हार्दिकने एबी डिव्हिल्यर्सच्या शैलीत मारलेला स्कूप जबरदस्तच होता."
- विराट कोहली, भारतीय कर्णधार
अधिक वाचा :
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.