India Vs New Zealand 2nd ODI: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारताला केवळ 109 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. न्यूझीलंडचा डाव 34.4 षटकांवर आटोपला.
दरम्यान, किवी संघाकडून ग्लेन फिलिप्सने (36) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 52 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार मारले. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) तीन बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ पत्त्यासारखा विखुरला. नियमित अंतराने विकेट गमावत न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर फिन ऍलन (0) पहिल्याच षटकात बाद झाला. हेन्री निकोल्स (2), डॅरिल मिशेल (1) आणि डेव्हॉन कॉनवे (7) फलंदाजी करु शकले नाहीत. कर्णधार टॉम लॅथम 17 चेंडूत फक्त 1 धाव करु शकला.
दुसरीकडे, अवघ्या 15 च्या एकूण धावसंख्येवर न्यूझीलंडचे 5 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले, यावरुन किवीच्या खराब स्थितीचा अंदाज लावता येतो. फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी मायकेल ब्रेसवेल (22) सोबत 41 धावांची भागीदारी केली आणि मिचेल सेंट्रन (27) सोबत सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करुन न्यूझीलंडला (New Zealand) शतकांच्या पुढे नेले.
आठवा खेळाडू म्हणून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, लॉकी फर्ग्युसनने 1 धाव आणि ब्लेअर टिकनरने 2 धावांचे योगदान दिले. हेन्री शिप्ली 2 धावा करुन नाबाद राहिला.
तसेच, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हैदराबादमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात किवींचा 12 धावांनी पराभव केला. रोहित ब्रिगेडची आता शनिवारी रायपूर वनडे जिंकून मालिकेत निर्णायक आघाडी घेण्याकडे लक्ष असेल.
त्याचबरोबर, न्यूझीलंडचा संघ या मालिकेत पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. जर भारताने दुसरी वनडे जिंकण्यात यश मिळवले तर न्यूझीलंडकडून नंबर वन वनडे संघाचा मुकुट हिसकावून घेतला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.