ICC World Test Championship: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी 1 डाव आणि 182 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची समीकरणे बदलताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका या स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामने जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान भक्कम केले आहे.
ऑस्ट्रेलिया या गुणतालिकेत 78.57 च्या विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशेला पराभवामुळे धक्का लागला आहे. गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकावरील संघच 2023 ला अंतिम सामना खेळणार आहेत.
दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होते. तसेच अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार होते. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागल्याने ते आता 50 च्या विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.
पण, यामुळे भारत आणि श्रीलंका संघांना फायदा झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार भारतीय संघ गुणतालिकेत 58.93 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच श्रीलंका 53.33 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
दरम्यान भारताला अजून मायदेशात फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका देखील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने भारताला अंतिम सामन्यासाठी दावेदारी ठोकण्यासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय संघाला चांगले यश मिळाल्यास अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या जवळ जाता येईल.
सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंड 46.97 विजयी टक्केवारीसह पाचव्या, वेस्ट इंडिज 40.91 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.