ICC made changes in some rules:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नव्या वर्षात काही नियमांमध्ये नवे बदल केले आहेत. काही नियमांचा खेळाडू फायदा उठवत होते, त्याचमुळे आयसीसीने नियमांमध्ये बदल केले आहेत. दरम्यान, याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
आयसीसीने केलेल्या बदलांमध्ये यष्टीरक्षकाने यष्टीचीत करण्याबद्दल आणि झेल घेण्याबद्दलचा नियमाचाही समावेश आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आता ज्यावेळी यष्टीरक्षक आणि त्याचा संघ फलंदाजाविरुद्ध यष्टीचीतसाठी अपील करेल, त्यावेळी मैदानातील पंच जेव्हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवतील, तेव्हा तिसरे पंच फक्त साईड-ऑन रिप्ले पाहतील. ते मागे यष्टीरक्षकाने झेल घेतला की नाही, हे तपासणार नाहीत.
यापूर्वी संघाने जर यष्टीचीतसाठी अपील केले असेल, तर पंचांच्या रिव्ह्यूमध्ये मागे झेल गेला आहे की नाही, हे देखील तपासले जायचे. त्यामुळे संघाला यष्टीरक्षकाच्या झेलासाठी वेगळा रिव्ह्यू घेण्याची गरज भासत नव्हती. अशात त्यांचा रिव्ह्यू देखील वाचत होता.
गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेने या नियमाचा बराच फायदा उचलला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा यष्टीचीतसाठी अपील करायचा, तेव्हा फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागला की नाही, हे देखील तपासले जात होते.
मात्र, आता बदललेल्या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला यष्टीरक्षकाने झेल घेतला की नाही, यासाठी वेगळा रिव्ह्यू घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, नव्या बदलांनुसार तिसरे पंच आता केवळ फ्रंट फुट नो-बॉल नाही, तर सर्व प्रकारच्या फुट-फॉल्टचे नो-बॉल तपासतील.
याशिवाय मैदानातील दुखापतग्रस्त खेळाडूच्या उपचारासाठी वेळ निश्चित करण्यात आला आहे. मैदानात खेळाडूला दुखापतीवर उपचारासाठी जास्तीत जास्त चार मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
त्याचबरोबर कन्कशनची समस्या उद्भवलेल्या खेळाडूला गोलंदाजीसाठी निलंबित केलेले असेल, तर त्याचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या खेळाडूलाही गोलंदाजीची संधी नसेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार हे सर्व नियम 12 डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.