Virat Kohli: भारताचा फलंदाज विराट कोहलीने अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 वर्ल्डकप, 2021 कसोटी चॅम्पियनशीप, 2021 टी20 वर्ल्डकप या आयसीसी स्पर्धांचा यात समावेश आहे. मात्र त्याला त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजेतेपद जिंकता आले नाही.
त्यामुळे अनेकदा विराटवर टीकाही केली जाते. याबद्दल आता विराटने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने म्हटले आहे की 'हे पाहा तुम्ही स्पर्धा जिंकण्यासाठीच खेळता. आम्ही 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पोहचलो, 2019 वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामन्यात, 2021 कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पोहचलो, आणि तरीही या आयसीसी स्पर्धांनंतर मला अपयशी कर्णधार समजण्यात येत होते.'
विराटच्या नेतृत्वाखाली 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021 कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये भारतीय संघाने अंतिम सामना खेळला होता. तसेच 2019 वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामना खेळला होता. पण 2021 टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ साखळी फेरीतून बाहेर झाला होता.
विराट म्हणाला, 'मी कधीही त्यादृष्टीने माझी पारख केली नाही. माझ्यासाठी आम्ही संघ म्हणून जे मिळवले आणि सांस्कृतीक बदल झाले, ती अभिनामाची गोष्ट आहे. स्पर्धा एका ठराविक कालावधीसाठी असतात. पण संस्कृती दीर्घ कालावधीसाठी घडत असते. त्यामुळे तुम्हाला सातत्य राखावे लागते.'
'मी खेळाडू म्हणून वर्ल्डकप जिंकलो आहे, मी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो आहे. मी पाचवेळा कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहणाऱ्या संघात होतो. तुम्ही जर त्यादृष्टीने पाहिले तर असे काही खेळाडू आहेत, जे कधीही वर्ल्डकप जिंकलेले नाहीत.'
विराट एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवलेल्या 2011 वर्ल्डकपमधील आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचा भाग होता. याबद्दल बोलताना विराट म्हणाला आहे की तो भाग्यशाली आहे की तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता.
तसेच त्याने असेही म्हटले की 'माझे ट्रॉफी कॅबिनेट पूर्ण भरावे यासाठी मी वेडा नाही. जेव्हा मी मागे वळून पाहातो, तेव्हा माझ्या कारकिर्दीत ज्या गोष्टी चांगल्या घडल्या, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.'
विराटने आत्तापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 492 सामन्यांमधील 549 डावांमध्ये 53.55 च्या सरासरीने 74 शतकांचा आणि 129 अर्धशतकांसह 25012 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.