पणजी ः आगामी आय-लीग फुटबॉल (I-League Football) स्पर्धेसाठी गोव्याच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) संघाने दोघा परदेशी फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. ब्राझीलियन मध्यरक्षक गिलेर्मे एस्कुरो (Guilherme Escuro) आणि लेबनॉनचा बचावपटू शादी स्काफ (Shadi Skaf) हे संघातील नवे खेळाडू आहेत. चर्चिल ब्रदर्स संघाला गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गतमोसमातील चारही परदेशी खेळाडूंना त्यांनी मुक्त केले असून आता नव्या खेळाडूंवर भर देण्यात आला आहे. आगामी मोसमासाठी त्यांनी रुमानियन पेत्र गिगियू यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय त्यांनी गिनी देशाचा आघाडीपटू सेकोऊ सिला याला मागील महिन्यात करारबद्ध केले होते. आतापर्यंत चर्चिल ब्रदर्सने तिघा परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले असून आणखी एका परदेशी खेळाडूस ते संघात घेऊ शकतील.
मध्यरक्षक एस्कुरो 27 वर्षांचा असून ब्राझीलमधील रेत्रो फुतेबॉल क्लबतर्फे खेळला आहे. बचावपटू स्काफ हा सुद्धा 27 वर्षांचा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर लेबनॉनचे प्रतिनिधित्व केले असून तो तेथील प्रीमियर लीग स्पर्धेत मागील वेळेस अल-अहली अखा अलेय संघाकडून खेळला होता. चर्चिल ब्रदर्सने दोन वेळा आय-लीग स्पर्धा जिंकली असून शेवटच्या वेळेस 2012-13 मोसमात ते या स्पर्धेत विजेते ठरले होते. गतमोसमात अखेरच्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सला दुसऱ्या ढकलत गोकुळम केरळाने आय-लीग विजेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेत खेळणारा चर्चिल ब्रदर्स हा एकमेव गोमंतकीय क्लब आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.