IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाच्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले. हा लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावानंतर स्टोक्स सीएसके संघात आल्याबद्दल एमएस धोनीची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी खुलासा केला आहे.
स्टोक्सला सीएसकेने 16.25 कोटींमध्ये लिलावादरम्यान खरेदी केले. त्याला सीएसकेने खरेदी केल्यानंतर अनेक चाहत्यांनी मत व्यक्त केले की सीएसकेचा कर्णधार म्हणूनही स्टोक्स एमएस धोनीला पर्याय ठरू शकतो. याबद्दल देखील आता कासी विश्वनाथन यांनी भाष्य केले आहे.
कासी विश्वनाथन इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, 'स्टोक्स संघात आल्याने खूप उत्सुक आहोत. आम्ही खूप नशीबवान देखील आहोत, कारण तो शेवटी आला होता. आम्हाला एक अष्टपैलू खेळाडू हवा होता आणि एमएस धोनी खूप खुष आहे की स्टोक्स संघात आला.'
'कर्णधारपदासाठी पर्याय नक्कीच आहे, पण याबद्दल वेळ आल्यावर धोनी निर्णय घेईल. काईल जेमिसन दुखापतग्रस्त होता, त्यामुळे कदाचीत दुसऱ्या संघांनी त्याला पसंती दिली नाही. पण, आम्हाला फ्लेमिंग यांनी माहिती दिलेली की तो बरा झाला आहे आणि खेळू शकतो.'
सीएसकेने न्यूझीलंडचा अष्टपैलू काईल जेमिसनला देखील खरेदी केले आहे. त्यांनी त्याला 1 कोटी रुपयात खरेदी केले.
याबरोबरच आगामी आयपीएल हंगामात सीएसके चांगली कामगिरी करेल अशी आशाही कासी विश्वनाथन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'सीएसकेचा संघ चांगला दिसत आहे आणि मला आशा आहे की आगामी हंगामात आम्ही चांगली कामगिरी करू. आम्ही नेहमीच प्रक्रियेचा विचार करतो आणि तेच आम्हाला चांगली कामगिरी करण्यास मदत करते.'
आयपीएल 2022 हंगामात सीएसकेचा संघ गुणतालिकेत 9 व्या क्रमांकावर राहिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.