Hockey World Cup 2023, 1st Day: शुक्रवारपासून हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. हा वर्ल्डकप भारतातील ओडिशा राज्यात खेळवण्यात येत आहे. हे हॉकी वर्ल्डकपचे 15 वे पर्व आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी स्पर्धेत 4 महत्त्वाचे सामने खेळवण्यात आले.
या वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले असून त्यांची 4 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या चार ग्रुपमध्ये सध्या साखळी फेरी सुरू आहे. या वर्ल्डकपला शुक्रवारी अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने सुरुवात झाली.
ए ग्रुपमधील अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भुवनेश्वरला झाला. दरम्यान या दोन्ही संघांनी पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकमेकांना तगडी लढत दिली होती. त्यामुळे हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ गोल नोंदवू शकले नाही.
पण, तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या 42 व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून मायको कासेलाने पहिला गोल नोंदवला. या एका गोलने मिळालेली आघाडी अर्जेंटिनाने चौथ्या क्वार्टरमध्येही कायम ठेवली. त्यामुळे अर्जेंटिनाने पहिला सामना 1-0 असा जिंकत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
वर्ल्डकपमधील दुसरा सामना ए ग्रुपमधीलच ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स संघात झाल्या. या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने 8 गोलपैकी 5 मैदानी गोल केले, तर 3 पेनल्टी कॉर्नरवर गोल केले.
भुवनेश्वरलाच झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टॉम क्रेग आणि जेरेमी हेवार्ड यांनी गोलची हॅट्रिक केली. तसेच फ्लिन ओगिल्वी आणि टॉम विकहॅम यांनी प्रत्येकी एक गोल केला.
पहिल्या दिवसातील तिसरा सामना डी ग्रुपमधील इंग्लड विरुद्ध वेल्स संघात पार पडला. राउरकेला येथे पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने 5-0 असा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात इंग्लंडने वेल्सवर वर्चस्व राखले होते.
इंग्लंडकडून पहिल्याच मिनिटाला निकोलस पार्कने मैदानी गोल नोंदवला होता. त्यानंतर लियाम ऍन्सेलने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये मिळून दोन गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. तर तिसऱ्या क्वार्टरमध्येच फिल रोपरने आणि चौथ्या क्वार्टरमध्ये निकोलस बँड्यूरकने प्रत्येकी एक गोल केला. त्यामुळे इंग्लंडनेही स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
पहिल्या दिवसातील अखेरचा सामना यजमान भारत विरुद्ध स्पेन यांच्यात बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर पार पडला. घरच्या चाहत्यांच्या उपस्थितीत भारतीय संघानेही चांगला खेळ करत विजयी सलामी दिली. भारताने स्पेनला 2-0 अशा गोलफरकाने पराभूत केले.
भारताकडून उपकर्णधार अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. रोहिदाने पहिल्याच क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर सामन्याच्या 12 व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर हार्दिकने दुसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या 26 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी वाढवली. नंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये स्पेनने भारताचा चांगली लढत दिली होती. पण भारताने आघाडी कायम राखली. हाफ टाईमनंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले, पण भारताने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये घेतलेल्या आघाडीमुळे सामना जिंकण्यासाठी मदत झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.