Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने शुक्रवारी मोठा निर्णय घेत संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. या निर्णयाने रोहित शर्माचा कर्णधार म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ संपला. 2013 मध्ये हिटमॅनची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हार्दिक पुढील हंगामात कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. आता या निर्णयाबाबत वेगवेगळ्या अपडेट्स समोर येत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यासाठी फ्रेंचायझीच्या मालकासमोर अनेक अटी ठेवल्या होत्या. यापैकी एक अट होती ती कर्णधारपदाबाबतची. एवढेच नाही तर फ्रँचायझीने कर्णधार रोहितलाही याची कल्पना दिली होती, तीही विश्वचषकादरम्यान. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या अंतिम फेरीतील पराभवामागे हेही कारण असू शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाचवेळा संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितच्या जागी हार्दिक पुढील हंगामात कर्णधार असेल, असे मुंबईने शुक्रवारी जाहीर केले. हिटमॅन पुढच्या मोसमात हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. 2015 मध्ये, हार्दिकने रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यामुळे त्याचे करिअरही बदलले. वृत्तानुसार, करारावर चर्चा करण्यापूर्वीच हार्दिकने मुंबई फ्रँचायझी मालकाला कळवले होते की, जर त्याने पुनरागमन केले तर त्याला संघाचे कर्णधारपद द्यावे.
वृत्तानुसार, विश्वचषकादरम्यानच रोहितला पुढील हंगामापूर्वी कर्णधारपदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. विश्वचषकादरम्यान हार्दिक उपकर्णधाराच्या भूमिकेत होता. त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. मात्र, टीम इंडियाच्या बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो जखमी झाला आणि त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. आयपीएल 2024 हे कर्णधार म्हणून हार्दिकचे तिसरे वर्ष असेल. 2022 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते. यानंतर गुजरात टायटन्स या नवख्या संघाने त्याचा कर्णधार म्हणून आपल्या संघात समावेश केला होता. 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली त्याने संघाला चॅम्पियन बनवले होते. 2023 च्या आयपीएलमध्ये गुजरातचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण विजेतेपदाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.
तथापि, त्याच्या आयपीएल पदार्पणानंतर आठ वर्षांनी हार्दिक त्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे जिथून त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली - ''रो (RO), 2013 मध्ये तू MI चे कर्णधारपद स्वीकारले. तु आम्हाला विश्वास ठेवण्यास सांगितले. तु आम्हाला जय-पराजयात हसवले. 10 वर्षे आणि पाच ट्रॉफी नंतर, आम्ही येथे आहोत.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.