Goa Sports : फोंड्यातील जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षकाच्या मेहनतीस राष्ट्रीय स्तरावर बक्षिसी

खेळाडू-प्रशिक्षक असलेल्या या मेहनती जिम्नॅस्टने सोमवारी गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पदकतक्त्यात स्थान मिळवून दिले.
Abhijeet Nimbalkar
Abhijeet NimbalkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sports : राज्यातील जिम्नॅस्टिक्समध्ये अभिजित निंबाळकर कौशल्यसंपन्न मार्गदर्शनासाठी ओळखला जातो. खेळाडू-प्रशिक्षक असलेल्या या मेहनती जिम्नॅस्टने सोमवारी गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पदकतक्त्यात स्थान मिळवून दिले. ‘‘ब्राँझपदक खूप खास आणि मौल्यवान असून मेहनतीसाठी बक्षिसी आहे,’’ अशी भावना त्याने व्यक्त केली.

अभिजित मूळचा महाराष्ट्रातील सातारा येथील कोंडवे गावचा. 2013 साली गोवा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनने त्याची फोंडा येथे प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. तेव्हापासून हा 32 वर्षीय जिम्नॅस्ट ‘गोवेकर’ बनला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली फोंड्यात कित्येक उदयोन्मुख जिन्मॅस्टिक्स खेळातील प्राथमिक ज्ञान संपादित करत आहेत. त्याने सोमवारी पुरुषांच्या ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्समधील ऑल अराऊंड फायनलमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. ‘‘मोक्याच्या क्षणी काही क्षुल्लक चुका झाल्या, त्यामुळे रौप्यपदक अगदी थोडक्यात हुकले. त्याची सल आहे, तरीही गोव्यासाठी प्रतिष्ठेचे पदक जिंकू शकलो ही भावना लाखमोलाची आहे,’’ असे अभिजितने सांगितले.

गोव्यातील जिम्नॅस्टिक्ससाठी अभिमानास्पद

‘‘जिन्मॅस्टिकमध्ये यंदाच्या स्पर्धेत गोव्याला पहिले पदक मिळाले ही संघटनेसाठी अभिमानास्पद बाब आहे. साधनसुविधांच्या दृष्टीने हा खेळ अतिशय महागडा असला, तरी आम्ही आव्हान पेलले. क्रीडामंत्री गोविंद गावडे, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक व सचिव गुरुदत्त भक्ता यांचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तयारीत मोलाचा पाठिंबा लाभला,’’ असे गोवा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर यांनी सांगितले. ‘‘राष्ट्रीय जिन्मॅस्टिक्समध्ये सफल ठरलेल्या अभिजितची आम्ही 2013 साली फोंडा केंद्रासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यामुळे तो आता गोमंतकीय जिन्मॅस्टिक्ससाठी भूषणावह ठरला आहे,’’ असे गोव्याच्या जिम्नॅस्टिक्स संघाचे व्यवस्थापक असलेले ठाकूर म्हणाले.

Abhijeet Nimbalkar
Water Bill Hike in Goa : पाणी दरवाढीवर सरकार ठाम

2009 पासून प्रसार-विकास

‘‘2009 साली आमच्या संघटनेची स्थापना झाली. तेव्हापासून या खेळाचा प्रसार व विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत. जिम्नॅस्टिक्स संघटनेला 2011 साली गोवा ऑलिंपिक संघटनेची, तर 2021 मध्ये गोवा क्रीडा प्राधिकरणाची संलग्नता मिळाली. आतापर्यंत राज्यभरात शंभरहून जास्त मुलं जिम्नॅस्टिक्समध्ये प्रशिक्षण घेत आहेत,’’ असे सुदेश ठाकूर यांनी नमूद केले.

खडतर परिश्रम सार्थकी

अभिजितने यापूर्वी जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे प्रतिनिधित्व करताना 2013 साली रौप्यपदक जिंकले होते. 2018 साली फिलिपिन्समधील मनिला येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत अभिजितला सहावा क्रमांक मिळाला होता. कराटे व फुटबॉल खेळातही पारंगत असलेल्या अभिजितने वयाच्या 13 व्या वर्षापासून जिम्नॅस्टिक्स गांभीर्याने घेतले. ‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघटनेने आमच्यासाठी पुणे येथे निवासी शिबिर घेतले. बुबुन दास यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात आम्ही भरपूर मेहनत घेतली. कौशल्य विकसित करण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आता राष्ट्रीय क्रीडा ब्राँझपदकामुळे सार्थकी लागल्याचे समाधान वाटतेय, खूप आनंद झालाय,’’ असे अभिजित म्हणाला.

‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माझ्या या पदकामुळे गोव्यातील युवा जिम्नॅस्टना प्रेरणा मिळेल. पदक जिंकल्यामुळे माझ्या प्रशिक्षणार्थींसाठी मी आता योग्य आदर्श बनलो आहे, त्याचा जास्त अभिमान वाटतो.’’, अशी प्रतिक्रिया अभिजित निंबाळकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com