पणजी: बुद्धिबळ ऑलिंपियाड ज्योत स्वीकारण्याचा आणि मार्गस्थ करण्याचा मान गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याला मिळाला आहे. येत्या रविवारी (ता. 3) फोंडा येथे भव्य स्वरूपात ज्योतीचे स्वागत केले जाईल, तेथे शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला कार्यक्रमही होईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले, की बुद्धिबळ ऑलिंपियाड ज्योत महाराष्ट्रातील नवी मुंबई येथून गोव्यात दाखल होईल. तीन रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रँडमास्टर अनुराग म्हामल ही ज्योत फोंड्यातील क्रांती मैदानावर मान्यवरांकडे सुपूर्त करेल. तेथून ज्योत फोंड्यातील राजीव कला मंदिरात नेण्यात येईल.
तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वागत होईल. राज्यातील सर्व शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, विद्यार्थी, एनसीसी विभाग, नेहरू युवा केंद्र, शारीरिक शिक्षण शिक्षक, तसेच राज्यातील सुमारे दोनशे बुद्धिबळपटू यांना या कार्यक्रमात सामावून घेण्यात येईल. रविवारी दुपारी अनुरागन ही ज्योत घेऊन मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे रवाना होईल. बुद्धिबळ ऑलिंपियाड चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे 28 जुलैपासून खेळली जाईल.
फोंड्यातील कार्यक्रमाचे यजमानपद क्रीडा व युवा व्यवहार खाते, तसेच गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्याकडे संयुक्तपणे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाही. आपल्यासह, कृषिमंत्री रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष, इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहतील, असेही क्रीडामंत्री गावडे यांनी नमूद केले.
अनुराग, भक्ती, लिऑन यांचा गौरव
फोंड्यातील बुद्धिबळ ऑलिंपियाड ज्योत स्वागत समारंभात गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर अनुराग म्हामल, सर्वांत युवा ग्रँडमास्टर लिऑन मेंडोसा, इंटरनॅशनल मास्टर किताबधारक पहिली गोमंतकीय महिला भक्ती कुलकर्णी यांचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.