फिरकी गोलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर सहा गडी गारद झाल्यानंतर एकनाथ केरकर व कर्णधार दर्शन मिसाळ यांनी झुंजार फलंदाजी केली. त्या जोरावर गोव्याला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात प्रतिकार करून फॉलोऑन टाळता आला. नंतर तळाच्या फलंदाजांनाही चिवट झुंज दिली, मात्र अखेर प्रयत्न अपुरे ठरले आणि झारखंडला 24 धावांची आघाडी मिळाली.
जमशेदपूर येथील कीनन स्टेडियमवर झालेल्या लढतीत गुरुवारी सामन्याचा तिसरा दिवस नाट्यमय ठरला. सकाळच्या सत्रात स्नेहल कवठणकर (18) व सिद्धेश लाड (33) या प्रमुख फलंदाजांना गमावल्यामुळे गोव्याची स्थिती 6 बाद 161 अशी होती आणि फॉलोऑन टाळण्यासाठी 76 धावांची गरज होती. डावखुरे शाहबाज नदीम व अनुकूल रॉय, तसेच ऑफस्पिनर उत्कर्ष सिंग यांची फिरकी फलंदाजांची परीक्षा घेत होती. अशा परिस्थितीत एकनाथ (73) व दर्शन (71) यांनी सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी करेली, त्यामुळे गोव्याचा फॉलोऑन टळला. झारखंडच्या 386 धावांना उत्तर देताना गोव्याचा डाव तिसऱ्या दिवसअखेर 362 धावांत संपुष्टात आला.
जिगरबाज फलंदाजी
सहा विकेट गमावल्यानंतर एकनाथ व दर्शन यांनी एकाग्रतेवर भर देत जिगरबाज फलंदाजी केली. खराब चेंडूंची प्रतीक्षा करत त्यांनी भागीदारी वाढवत नेली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा गोव्याने 6 बाद 208 धावा केल्या होत्या. गोव्याचा संघ तीनशे धावांच्या दिशेने असताना जमलेली जोडी फुटली. एकनाथला नदीमने त्रिफळाचित बाद केले. त्याने 145 चेंडूंत 11 चौकारांच्या मदतीने 73 धावा नोंदविल्या.
तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार
दुसराच रणजी सामना खेळणारा मोहित रेडकर याने दर्शनला छान साथ दिली. त्यांनी आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. वैयक्तिक ३९ धावांवर मोहितला नदीमने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले, धावसंख्येत आणखी चार धावांची भर पडल्यानंतर दर्शन अनुकूलच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाल्याने गोव्याला धक्का बसला. डावखुऱ्या दर्शनने 164 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 71 धावांची कौतुकास्पद खेळी केली. नंतर लक्षय गर्ग (20) व पहिलाच सामना खेळणारा शुभम देसाई (नाबाद 12) यांनीही प्रयत्न केल्यामुळे गोव्याला आघाडीची संधी प्राप्त झाली, मात्र मध्यमगती सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक कुशाग्रने लक्षयचा झेल पकडल्यामुळे गोव्याला आघाडीपासून दूर राहावे लागले.
संक्षिप्त धावफलक
झारखंड, पहिला डाव : 386
गोवा, पहिला डाव (4 बाद 99 वरून): 134.3 षटकांत सर्वबाद 362 (स्नेहल कवठणकर 18, सिद्धेश लाड 33, एकनाथ केरकर 73, दर्शन मिसाळ 71, मोहित रेडकर 39, शुभम देसाई नाबाद 12, लक्षय गर्ग 20, सुशांत मिश्रा 1-43, शाहबाज नदीम 4-86, अनुकूल रॉय 1-64, उत्कर्ष सिंग 4-71).
अर्धशतकवीर...
- एकनाथ केरकरची 7 रणजी क्रिकेट सामन्यांत 6 अर्धशतके
- गोव्यातर्फे एकनाथची 4 रणजी सामन्यांतील 8 डावांत 5 अर्धशतके
- दर्शन मिसाळचे 59 व्या रणजी क्रिकेट सामन्यात 15 अर्धशतके
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.