Goa Sports : देशांतर्गत क्रिकेटमधील २०२३-२४ मोसमात गोव्याकडून रणजी क्रिकेट खेळणारे दोन्ही ‘पाहुणे’ कर्नाटकी असतील. बंगळूरमधील वृत्तानुसार, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ना हरकत दाखला मंजूर केल्यामुळे मध्यफळीतील ३० वर्षीय कृष्णमुर्ती व्यंकटेश (केव्ही) सिद्धार्थ आणि २९ वर्षीय डावखुरा रोहन कदम या फलंदाजांचा गोव्याकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बंगळूरमधील वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि रोहन यांच्याव्यतिरिक्त कसोटीपटू करुण नायर व अष्टपैलू श्रेयस गोपाळ यांनीही कर्नाटक संघटनेचा निरोप घेतला असून ते अनुक्रमे विदर्भ आणि केरळच्या संघातून खेळण्याचे संकेत आहेत.
गोव्याने गतमोसमातील पाहुणा अर्जुन तेंडुलकर याला संघात राखले असून सिद्धेश लाड व एकनाथ केरकर या मुंबईच्या खेळाडूंना मुक्त केले होते. त्यांची जागा मध्यफळीत अनुक्रमे सिद्धार्थ व रोहन घेतील हे स्पष्ट आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सिद्धार्थ २० सामने खेळला असून तीन शतके व १० अर्धशतकांसह त्याने ४४.५१च्या सरासरीने १४६९ धावा केल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये पदार्पण केल्यानंतर, जून २०२२ मध्ये तो उत्तर प्रदेशविरुद्ध कर्नाटकतर्फे रणजी स्पर्धेत शेवटच्या वेळेस खेळला होता.
‘‘निर्णय घेण्यापूर्वी मी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. गोव्यात मला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी आहे,’’ असे सिद्धार्थने बंगळूर येथे सांगितले.
आक्रमक शैलीसाठी डावखुरा रोहन कदम ओळखला जातो. रणजी क्रिकेट स्पर्धेत तो कर्नाटकतर्फे २०२० मध्ये चार सामने खेळला, मात्र त्याची व्हाईट बॉल क्रिकेटमधील कारकीर्द उल्लेखनीय आहे.
टी-२० स्पर्धेत त्याने २९ सामन्यांत ४१.०८ची सरासरी आणि १२७.७३च्या स्ट्राईक रेटने नऊ अर्धशतकांसह १०२७ धावा केल्या आहेत.
कर्नाटकतर्फे तो झटपट क्रिकेटमध्ये २०१७ ते २०२१ या कालावधीत खेळला. ‘‘घर सोडताना चांगले वाटत नाही, पण संघ व्यवस्थापनाला नवोदितांना जास्त संधी द्यायची आहे. मला पुन्हा संधी मिळण्याबाबत खूप संदिग्धता आहे. त्यामुळेच मी हा कठीण निर्णय घेतला,’’ असे रोहनने बंगळूरमध्ये सांगितले.
नव्या पाहुण्यांची कारकीर्द
केव्ही सिद्धार्थ : वय ३० वर्षे, उजव्या हाताने फलंदाजी
२० प्रथम श्रेणी सामन्यांत ४४.५१च्या सरासरीने ३ शतके व १० अर्धशतकांसह १४६९ धावा. लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील १६ सामन्यांत ४७.९०च्या सरासरीने ५२७ धावा व ४ अर्धशतके. २ टी-२० सामन्यांत २७ धावा.
रोहन कदम : वय २९ वर्षे, डाव्या हाताने फलंदाजी.
४ रणजी क्रिकेट सामन्यांत २५च्या सरासरीने १५० धावा. १३ लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट सामन्यांत ३१.८७च्या सरासरीने एका अर्धशतकासह २५५ धावा. २९ टी-२० सामन्यांत ९ अर्धशतकांसह ४१.०८च्या सरासरीने १०२७ धावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.