गोवा क्रिकेट असोसिएशनकडून ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटला प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव

shaun tait.jpg
shaun tait.jpg
Published on
Updated on

पणजी: भारताचा जावई, ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट (Shaun Tait) निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनू पाहत आहे. त्या अनुषंगाने गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) या 38 वर्षीय माजी कसोटीपटूस प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव दिला आहे, पण ॲडलेडमध्ये जन्मलेल्या खेळाडूने अजून होकार कळवलेला नाही. (Goa Cricket Association has proposed Shaun Tait as its coach)

शॉन टेट याने दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमास मुलाखत दिली, त्यानुसार तो पत्नी व मुलीसह ब्रिटनमध्ये स्थलांतर करणार आहे, तसेच कॅनडा आणि अबुधाबीत प्रशिक्षकपदाची संधी शोधण्याचा त्याचा मानस आहे. त्यामुळे जीसीएचा प्रस्ताव प्राथमिक स्वरूपातच राहण्याची शक्यताही आहे. गतमोसमात तो ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमध्ये हॅनडॉर्फ क्लबकडून खेळला होता, आता त्याने पूर्णतः प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचे ठरविले आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या माहितीनुसार, भारतात क्रिकेट प्रशिक्षण द्यायचे झाल्यास टेटचे गोव्याला प्राधान्य आहे. जीसीएने त्याच्याशी प्राथमिक पातळीवर चर्चा केली असून ती खूपच सकारात्मक ठरली आहे. काही ठराविक कालावधीत प्रशिक्षकपदासाठी गोव्यात राहण्यास टेटचे प्राधान्यक्रम आहे. चर्चा सफल ठरल्यास तो जीसीएचा प्रस्ताव स्वीकारूही शकतो.

अतिशय वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा टेट 2005 ते 2016 या कालावधीत 5 कसोटी, 35 एकदिवसीय व 21 टी-20आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.  2007 मध्ये विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाचे योगदान देताना 23 विकेट मिळविल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे त्याची कारकीर्द उंची गाठू शकली नाही.

टेटची पत्नी माशूम सिंघा ही माजी भारतीय मॉडेल आहे. तिच्याशी त्याने 2014 मध्ये लग्न केले, त्यानंतर त्याला 2017 साली विदेशस्थित भारतीय नागरिकत्व मिळाले. साहजिकच टेट भारतात प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक आहे.

कानिटकर यांचे नावही चर्चेत

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे माजी कसोटीपटू अष्टपैलू ह्रषीकेश कानिटकर यांचे नाव आगामी मोसमात गोव्याच्या प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) त्यांच्या कराराचे नूतनीकरण झाले नाही, तर जीसीए त्यांना नियुक्त करू शकते. यापूर्वी 2015-16 मोसमात कानिटकर गोव्याच्या रणजी संघाचे प्रशिक्षक होते.

झोयसा पहिले परदेशी

श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज कसोटीपटू नुवान झोयसा 2013-14  ते 2014-15 या कालावधीत गोव्याच्या रणजी संघाचे प्रशिक्षक होते. ते गोव्याचे पहिले परदेशी रणजी संघ प्रशिक्षक आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com