Ethan Vaz Makes His First IM Norm: गोव्याचा फिडे मास्टर युवा बुद्धिबळपटू एथन वाझ याने कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठताना इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताबाचा पहिला नॉर्म मिळविला.
अबुधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात या अकरा वर्षीय खेळाडूने ग्रँडमास्टर, आयएम खेळाडूंचा सामना करताना २४८४ गुणांची चमकदार मानांकन कामगिरी बजावली.
एथनने अबुधाबीतील स्पर्धेत तीन ग्रँडमास्टर, चार आयएम खेळाडूंचा सामना करताना नऊ फेऱ्यांतून साडेचार गुणांची कमाई करत आयएम किताबाचा पहिला नॉर्म प्राप्त केला. त्याने २३०० एलो गुणांचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करताना तो गोव्यातील युवा बुद्धिबळपटू ठरला.
एथन ‘जीनो’चा सदिच्छादूत आहे. स्पर्धेत २४ देशांतील १४५ खेळाडूंचा सहभाग होते, त्यात एथनला १३४ वे मानांकन होते. मानांकनाच्या तुलनेत गोव्याच्या या प्रतिभाशाली खेळाडूने खूपच लक्षवेधक खेळ केला.
आयएम खेळाडूंना नमविले
सध्या २३०६ एलो गुण असलेल्या एथनने अबुधाबीतील स्पर्धेत बलाढ्य आयएम खेळाडूंना नमविले. यामध्ये अजय कार्तिकेयन (एलो २४५०), एस. रवी तेजा (२४५०), पौर आगा बाला अमिरेझा (२५२१) यांचा समावेश आहे.
एथनने ग्रँडमास्टर मुर्झिन व्होलोदोर (२६३१), आयएम संकेत चक्रवर्ती (२३८५), ग्रँडमास्टर स्वप्नील धोपाडे (२४७९) यांना बरोबरीत रोखले. ग्रँडमास्टर व्ही. एस. रत्नावेल (२४९१), ग्रँडमास्टर रेमंड साँग (२५१२) व आयएम ए. मुथय्या (२४५८) यांच्याविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला.
एलो मानांकनात ४१ गुणांची भर
अबुधाबीतील शानदार कामगिरीमुळे एथनच्या फिडे एलो मानांकनात ४१ गुणांची भरीव भर पडली. ‘‘या स्पर्धेसाठी मला पुरस्कृत करणाऱ्या ‘जीनो’प्रती कृतज्ञ आहे.
माझे प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग व ग्रँडमास्टर स्वयम मिश्रा, नेहमीच प्रोत्साहन देणारे द किंग्स स्कूल, चेसबेस इंडिया, गोवा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, पाठिराखे आणि शुभचिंतक यांचेही मी आभार मानतो,’’ असे एथनने गोव्यात परतल्यानंतर शुक्रवारी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.