पणजी: आदित्य कौशिकच्या (Aditya Kaushik) तडाखेबंद नाबाद अर्धशतकानंतर फिरकी गोलंदाज अमित यादव (Amit Yadav) याच्या जबरदस्त कामगिरीमुळे सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने (Goa) शुक्रवारी पुदुचेरीस नऊ धावांनी हरविले. एलिट अ गट सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झाला.
गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघात चार वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या अमितची ऑफस्पिन खूपच प्रभावी ठरली. नव्या चेंडूने गोलंदाजी टाकताना त्याने पुदुचेरीस सुरवातीस कोंडीत अडकविले. पहिल्याच षटकात दोघांना बाद केलेल्या अमितने सुरवातीच्या स्पेलमध्ये ३-२-३-३ असे भन्नाट पृथक्करण राखल्यामुळे पुदुचेरीची चौथ्या षटकात ४ बाद १९ अशी घसरगुंडी उडाली. त्यामुळे गोव्याला १६१ धावांचे यशस्वीपणे संरक्षण करणे शक्य झाले. डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघ यानेही मोक्याच्या क्षणी गडी बाद केल्यामुळे पुदुचेरीस ७ बाद १५२ धावाच करता आल्या. अमितने १६ धावांत ३ गडी बाद केले. वाघ यानेही ३ विकेट मिळविताना ३८ धावा दिल्या.
अनुभवी पारस डोग्रा आणि पवन देशपांडे यांनी टिच्चून फलंदाजी केल्यामुळे गोव्याच्या गोटात चिंता निर्माण झाली होती. वाघ याने पवनला (२९) सुयश प्रभुदेसाई याच्याकरवी झेलबाद करून पाचव्या विकेटसाठी जमलेली ८२ धावांची भागीदारी फोडली. त्यानंतरही डोग्रा याने टोलेबाजी केली. पुदुचेरीस शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. डोग्राने लक्षय गर्गच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचल्यानंतर पुढील दोन चेंडू निर्धाव गेले, त्याचवेळी लक्षय जायबंदी झाल्यामुळे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी शुभम रांजणे याच्यावर आली. यावेळी पुदुचेरीस तीन चेंडूंत २३ धावा हव्या होत्या. डोग्राने पहिल्या दोन चेंडूवर सलग षटकार मारल्यानंतर पुढील चेंडूवर एकच धाव निघाली आणि गोव्याला यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय नोंदविणे शक्य झाले. डोग्रा ८४ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूंत सात चौकार व पाच षटकार लगावले.
आदित्यची आक्रमक फलंदाजी
गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईशान गडेकर (१५) लवकर बाद झाल्यानंतर लक्षय गर्गने बढती देण्याचा निर्णय सार्थ ठरविला. आदित्य कौशिकने लक्षयसह दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. लक्षय (२८) बाद झाल्यानंतर कर्णधार एकनाथ केरकर (११) धावबाद झाल्यामुळे गोव्याला झटका बसला. आदित्य व शुभम रांजणे (२९) यांनी चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची अभेद्य भागीदारी केल्यामुळे गोव्याला दीडशतकी टप्पा ओलांडता आला. आदित्यने नाबाद ६९ धावा करताना ५८ चेंडूंतील खेळीत सात चौकार व दोन षटकार खेचले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.