इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामासाठी काल चेन्नईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला 2.20 कोटींमध्ये खरेदी केले. स्टिव्ह स्मिथची वेस प्राईज दोन कोटी रुपये होती. तर स्टीव्ह स्मिथ मागील आवृत्तीत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. आणि संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या स्पर्धेत स्टीव्ह स्मिथ आणि राजस्थान संघाची कामगिरी निराशजनक झाली होती. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला यंदाच्या लिलावात खरेदी करण्यास कोणताही संघ उत्सुक नसल्याचे पाहायला मिळाले. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने स्टीव्ह स्मिथला आपल्या संघात सामील केले. त्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सच्या स्टीव्ह स्मिथला खरेदी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
आयपीएल स्पर्धेच्या चौदाव्या हंगामासाठीच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने स्टीव्ह स्मिथला 2.20 कोटी रुपयात करारबद्ध केले. त्यानंतर गौतम गंभीरने स्टीव्ह स्मिथसारख्या फलंदाजाची दिल्ली कॅपिटल्स संघाला गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. स्टीव्ह स्मिथच्या खरेदीवर बोलताना दिल्लीचा संघ त्याला कुठे फिट करणार हे समजण्याच्या पलीकडे असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात शिखर धवन सारखा फुल फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. तसेच पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे अगोदरच संघात आहेत, तर मार्कस स्टॉयनिस देखील दाखल होणार आहे. आणि नॉटीजे व रबाडा देखील असल्यामुळे स्टीव्ह स्मिथसारखा फलंदाज हा दिल्लीसाठी काही कामाचा नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला स्टीव्ह स्मिथची अजिबातच गरज नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले असून, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रॅन्चायझीला स्टीव्ह स्मिथला खेळवण्यात रस असेल तर त्यांच्या दृष्टीकोनातून हा निर्णय चांगला असू शकतो, असे गौतम गंभीरने पुढे या मुलाखतीत म्हटले आहे. मात्र आपणाला हा निर्णय चुकीचा वाटल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केले. त्यानंतर ख्रिस वोक्स देखील संघात सामील होणार असून, संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे हे खेळाडू स्वस्तात मिळाले असल्याचे त्याने पुढे सांगितले. आणि दिल्लीचा संघ स्टीव्ह स्मिथ सारख्या खेळाडूला खरेदी करेल असे कधीच वाटले नव्हते, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.