France v Morocco: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत बुधवारी दुसरा उपांत्य सामना फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात होणार आहे. अल बायत स्टेडियमवर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होईल.
अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी मोरोक्को आणि फ्रान्स हे दोन्ही संघ आज प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील. दरम्यान, मोरोक्कोचा हा फिफा वर्ल्डकपमधील पहिलाच उपांत्य सामना आहे. मोरोक्को उपांत्य सामना खेळणारा पहिलाच आफ्रिकन संघही आहे. त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत हा इतिहास रचला होता.
त्यामुळे आता मोरोक्कोचा विश्वास वाढला असून ते गतविजेत्या फ्रान्सलाही आव्हान देण्यास सज्ज आहेत. फ्रान्सनेही या स्पर्धेत आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता वर्ल्डकप विजेतेपद आपल्याकडेच राखण्यासाठी फ्रान्सचे प्रयत्न आहेत.
आत्तापर्यंत केवळ ब्राझील आणि इटलीला सलग दोन वेळा वर्ल्डकप विजेतेपद मिळवता आले आहे. त्यांच्यानंतर आता ही संधी फ्रान्सकडे असणार आहे. इटलीने 1934 आणि 1938 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले होते, तर ब्राझीलने 1958 आणि 1962 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले आहेत. तसेच फ्रान्स आज सातव्यांदा उपांत्य फेरीत खेळताना दिसणार आहेत.
एकूणच आज होणाऱ्या सामन्यात तगड्या फ्रान्सला आव्हान देण्यासाठी मोरोक्कोला दमदार खेळ दाखवावा लागणार आहे. फ्रान्सच्या ऑलिव्हर गिरोडकडे या सामन्यात सर्वांचेच लक्ष असेल. तसेच फ्रान्सच्या फ्रंट लाईनवर डेम्बेले, एमबाप्पे असे तगडे खेळाडू आहेत. बेंझेमाच्या अनुपस्थितही फ्रान्सची फ्रंट लाईन भक्कम आहे.
तसेच मोरोक्कोला मात्र त्यांच्या खेळाडूंच्या दुखापतींची चिंता असेल. त्यांचे रोमेन सैस, नायेफ अगुएर्ड आणि नौसेर मजरौई या खेळाडूंच्या खेळण्यावर दुखापतीमुळे प्रश्नचिन्ह आहे.
त्याचबरोबर यापूर्वी फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात कधीही सामना झालेला नाही. हा फिफा वर्ल्डकपमधील या दोन संघांमधील पहिलाच सामना आहे.
आता आज या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल, तो रविवारी अर्जेंटिनाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत क्रोएशियाला पराभूत केले आहे. तसेच आज जो संघ पराभूत होईल, तो क्रोएशियाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात दोन हात करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.