FC Goa Defender Sandesh Jhingan: फुटबॉलमधील आतापर्यंतच्या वाटचालीत सफलता मिळवली असली, तरी आपण आत्मसंतुष्ट नाही. प्रत्येकी वेळी पुढील सामन्याचाच विचार मनात असतो, असे मत भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि एफसी गोवाचा हुकमी बचावपटू संदेश झिंगन याने गुरुवारी व्यक्त केले. कोलकाता येथे शनिवारी (ता. 23) एफसी गोवा आणि मोहन बागान सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला जाईल.
सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघ अपराजित आहे. आठ सामन्यांत सहा विजय आणि दोन बरोबरींसह त्यांनी 20 गुण प्राप्त केले असून सध्या अव्वल स्थानी आहेत. मोहन बागानला बुधवारी मुंबई सिटीकडून 2-1 फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची अपराजित मालिका खंडित झाली. आठ सामन्यांत सहा विजय, एक बरोबरी आणि एक पराभव या कामगिरीसह 19 गुण मिळवून ते तिसऱ्या स्थानी आहेत. स्पर्धेत यंदा एफसी गोवाने तब्बल 500 मिनिटे गोल स्वीकारलेला नाही.
तीस वर्षीय अनुभवी झिंगन म्हणाला, की `यावेळचा सामना संपला की लगेच पुढील सामन्याच्या तयारीला लागतो, तेच माझे ध्येय असते. मी आत्मसंतुष्ट नाही. नेहमीच भविष्याचा विचार करण्यावर भर देतो. संघाने यशस्वी ठरावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असतो.`
दरम्यान, एफसी गोवा संघाने यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील सहा सामन्यांत क्लीन शीट्स राखताना गोल स्वीकारलेला नाही. या वाटचालीत बचावफळीतील संदेश याचाही मोलाचा वाटा आहे. याविषयी तो म्हणाला, की 'आम्ही एवढे सामने क्लीन शीट्स राखून शकतो हे एकप्रकारे चांगलेच आहे. मी माझ्यापरीने वाटा उचलतो, पण एकंदरीत ही सांघिक मेहनत आहे. संघातील प्रत्येकजण योगदान देत आहे. प्रत्येक खेळाडूंची कामगिरी महत्त्वपू्र्ण आहे.'
मूळ चंडीगडचा संदेश 2011 पासून व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे. आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसी, एटीके मोहन बागानतर्फे खेळल्यानंतर 2023-24 मोसमासाठी एफसी गोवाशी करार केला. या स्पर्धेत आतापर्यंत तो 137 सामने खेळला आहे. यंदा आठ आयएसएल सामने खेळताना त्याने एफसी गोवातर्फे स्पर्धेतील आपला पहिला वैयक्तिक गोलही नोंदवला. ईस्ट बंगालविरुद्ध 21 ऑक्टोबर रोजी भुवनेश्वर येथे एफसी गोवाच्या दोन गोलच्या विजयात संदेशने पहिला गोल केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.