FC Goa: एफसी गोवा संघाने बचावपटू निखिल प्रभू (Nikhil Prabhu) याच्याशी दीड वर्षांसाठी करार केला आहे. सध्या सुरू असलेल्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत ओडिशा एफसीचा (Odisha FC) सदस्य असलेला 22 वर्षीय फुटबॉलपटू 2024 पर्यंत गोव्यातील संघात असेल.
(FC Goa complete signing of defender Nikhil Prabhu)
एफसी गोवाने गुरुवारी निखिल प्रभूशी केलेल्या कराराची माहिती दिली. ‘‘एफसी गोवा संघ युवा खेळाडूंना भरपूर संधी देतो. या संघाने माझ्यासाठी उत्सुकता दाखविली, तेव्हा मी लगेच होकार दिला. एफसी गोवाची खेळण्याची शैली आगळी आहे. युवा बचावपटू या नात्याने खेळात प्रगती साधण्यावर माझा भर राहील,’’ असे निखिलने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.
आयएसएल स्पर्धेत एफसी गोवास पहिल्या सहा संघात स्थान मिळवून देणे हे त्वरित लक्ष्य असल्याचे त्याने नमूद केले. निखिलचे संघात स्वागत करताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी सांगितले, की ‘‘तो चेंडूवर ताबा राखू शकणारा आश्वासक असा उदयोन्मुख सेंटर-बॅक खेळाडू आहे. एफसी गोवा संघात बस्तान बसविण्याची त्याचा चांगली संधी आहे.’’
आश्वासक युवा फुटबॉलपटू
महाराष्ट्रातील मुंबई एफसी, तसेच ठाणे एफसीच्या ज्युनियर संघातून कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर निखिल 2018 साली तेव्हाच्या पुणे सिटी एफसी संघात दाखल झाला. हा संघ बंद झाल्यानंतर तो हैद्राबाद एफसीचा सदस्य बनला. 2019-20 मोसमात निखिल हैदराबादच्या राखीव संघातून द्वितीय विभागीय आय-लीग स्पर्धेत खेळला.
2021-22 मोसमात त्याने लोनवर ओडिशा एफसी संघाचे आयएसएल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. 2021-22 मोसमाच्या सुरवातीस ओडिशाने त्याच्याशी नियमित स्वरुपाचा करार केला होता. यंदा, तसेच गतमोसमात निखिल ओडिशातर्फे एकूण सहा आयएसएल सामने खेळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.