पणजीः एफसी गोवाने (FC Goa) ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup Football) स्पर्धेत ब गटातून अपेक्षित उपांत्यपूर्व फेरी गाठताना सुदेवा दिल्ली एफसीवर (Sudeva Delhi FC) 2-1 फरकाने मात केली. कोलकात्यातील (Kolkata) विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर सोमवारी हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुण प्राप्त केले व गटात अव्वल स्थान मिळविले. एफसी गोवातर्फे प्रथमच स्टार्ट मिळविलेल्या महंमद नेमिल याने 45+2व्या मिनिटास एफसी गोवाच्या खाती गोलची भर टाकली. नंतर बदली खेळाडू स्पॅनिश होर्गे ओर्तिझ याने 80व्या मिनिटास दुसरा गोल नोंदविला, पण त्याला झालेली दुखापत एफसी गोवासाठी चिंताजनक ठरली. सुदेवा दिल्लीचा एकमात्र गोल 90+8व्या मिनिटास विल्यम पावलियानखूम याने पेनल्टी फटक्यावर नोंदविला.
अगोदरच्या लढतीत आर्मी ग्रीन संघाला 2-0 फरकाने हरविलेल्या एफसी गोवाचे आता सहा गुण झाले आहेत. सुदेवा दिल्ली संघास सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. एफसी गोवाचा गटसाखळीतील तिसरा व शेवटचा सामना शुक्रवारी (ता. 17) जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. पाऊस आणि अंधूक प्रकाशात झालेल्या सामन्यात एफसी गोवाने वर्चस्व राखले. एफसी गोवातर्फे पहिलाच मोसम खेळणाऱ्या 19 वर्षीय नेमिला पूर्वार्धातील भरपाई वेळेत गोलशून्य कोंडी फोडली. त्याचा वीस यार्डावरून मारलेला सणसणीत फटका भेदक ठरला. सामन्यातील दहा मिनिटे बाकी असताना ओर्तिझने एफसी गोवाची आघाडी वाढविली. यावेळी चेंडू गोलपट्टीस आपटून गोलरेषेच्या आत गेला. नंतर लगेच सुदेवा दिल्लीच्या अकबर सिंग याने त्याला हानीकारक टॅकल केले, त्यामुळे स्पॅनिश खेळाडूस मैदान सोडावे लागले. भरपाई वेळेत एफसी गोवाच्या एदू बेदिया याने गोलक्षेत्रात सुदेवा दिल्लीच्या खेळाडूस अडथळा आणल्यामुळे दिल्लीच्या संघास पेनल्टी फटका मिळाला. यावेळी विल्यमने अचूक नेम साधला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.